

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी आणि अर्जाचा भाग एक भरण्याच्या प्रक्रियेला गुरुवारी (दि. 25) सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पुणे आणि पिंपरी-चिंचवड मिळून एकूण 7 हजार 354 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 2 हजार 679 विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याने त्यांचे अर्ज लॉक झाले.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. त्याप्रमाणे ही प्रक्रिया प्रत्यक्ष गुरुवारपासून सुरू झाली. विद्यार्थ्यांची नोंदणी, अर्जाचा भाग एक भरणे, अर्ज व्हेरिफाय करून घेणे ही कार्यवाही त्यामध्ये केली जात आहे.
अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील एकूण 319 महाविद्यालयांसाठी सुरू आहे. गुरुवारी पहिल्या दिवशी 7 हजार 354 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 2 हजार 679 विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याने त्यांचे अर्ज लॉक झाले. तर, 1037 विद्यार्थ्यांचे अर्ज अॅटो व्हेरिफाय करण्यात आले.
उच्च माध्यमिक विद्यालयांची नोंदणी, कनिष्ठ महाविद्यालयांनी भरलेली माहिती तपासून शिक्षण उपसंचालकांनी ऑनलॉइन प्रमाणित करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. अर्जातील भाग दोन, महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरू होणार आहे. अद्याप या निकालाची प्रतीक्षा आहे.
अकरावीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रियेत सध्या अर्जाचा भाग-1 भरून घेतला जात आहे. अर्जाच्या पहिल्या भागात विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक माहितीचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी अॅडमिशन बुकलेटमधून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची माहिती घेऊन अर्ज भरावेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ वगळता अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना स्टेट बोर्डअंतर्गत महाविद्यालयांमध्ये अकरावीला प्रवेश घेता येतो. मात्र, त्यांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोर्डाने दिलेल्या केंद्रांवर जाऊन कागदपत्रांची तपासणी करून घ्यावी लागते. दहावीचा निकाल लागल्यानंतर अर्जाचा भाग-2 भरण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे.
– डॉ. रणजित पाटील, प्राचार्य, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज, पिंपरी.