

पुणे : देशात यंदाचा उन्हाळा मागील वर्षाच्या तुलनेत सुसह्य ठरणार आहे. कारण, देशभरातील मोठ्या 155 जलसाठ्यांत 70 टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. महाराष्ट्रात मात्र बाष्पीभवन वेगाने होत असल्यामुळे हा साठा 51 टक्के इतकाच आहे. त्यामुळे राज्यात पाणी जपून वापरावे लागणार आहे.
22 मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त जगभरातील पाणीसाठ्याचा लेखाजोखा तसेच पाण्याची उपलब्धता, यावर जगभरातील जलतज्ज्ञ एकत्र येऊन आपले विचार मांडतात. दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची कमतरता, हवामानातील बदल, याच्या परिणामामुळे पिण्याचे पाणी कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील पाणीसाठ्यासह महाराष्ट्राचा आढावा घेतला असता 20 मार्चपर्यंत देशातील मोठ्या 155 जलसाठ्यांची स्थिती खूप चांगली आहे. देशाच्या मोठ्या जलसाठ्यांमध्ये किमान 70 टक्के पाणी शिल्लक आहे, तर महाराष्ट्रात 51 टक्के पाणी पिण्यायोग्य शिल्लक आहे. अजून एप्रिल आणि मे महिना जायचा आहे. त्यामुळे यंदा पाणी जपून वापरावे लागणार आहे.
गेल्या दहा वर्षांच्या जलसाठ्याच्या सरासरीचा अंदाज घेतला तर असे लक्षात येते की, यंदा 80 टक्क्यांपेक्षा जास्त स्थिती चांगली आहे. जलसाठा असलेल्या जिल्ह्यांसह प्रकल्पांचे राज्यनिहाय वितरण सुधारले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात होणारी भीषण पाणीटंचाई सुमारे 25 ते 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. याचे मुख्य कारण साठवणुकीच्या नियोजनात केलेले बदल हे आहे. जलसाठ्यातून होणारी पाणीगळती कमी केल्यानेही हा मोठा फायदा झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
केंद्रीय जल आयोग 155 जलाशयांच्या जिवंत साठवणुकीच्या स्थितीचे निरीक्षण दर आठड्याला गुरुवारी करत आहे. जलसाठ्याचे साप्ताहिक बुलेटीन जारी करत आहे. 155 जलाशयांमध्ये 257.812 बिलियन क्युबिक मीटर (अब्ज घन मीटर) इतका जिवंत पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी 70.15 टक्के इतकी आहे.
पूर्वेकडील राज्यांत आसाम, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल ही राज्ये समाविष्ट आहेत. त्रिपुरा, नागालँड आणि बिहार येथे जिवंत जलाशयांची स्थिती खूप चांगली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत या राज्यांत साठा 49 टक्के होता. चालू वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थिती बरी आहे.