

रामदास डोंबे
खोर: पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत दौंड तालुक्यातील राजकीय चित्र पूर्णतः बदलून टाकत माजी आमदार रमेश थोरात यांनी पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. जिल्हा परिषदेच्या 7 पैकी तब्बल 6 जागांवर विजय मिळवत रमेश थोरातांनी दौंड तालुक्याचे ‘धुरंधर’ आपणच असल्याचे दाखवून दिले आहे. दौंड नगरपालिकेतील यशानंतर सलग दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत सत्ता केंद्रस्थानी ठेवण्यात थोरात यशस्वी ठरले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात रमेश थोरात यांना नेहमीच दौंडच्या मतदारांकडून झुकते माप मिळाले आहे. या वेळच्या निवडणुकीत त्याचा प्रत्यय पुन्हा आला. खडकी-देऊळगावराजे गटात वीरधवल जगदाळे, वरवंड-पारगाव गटात डॉ. गायत्री खळदकर, केडगाव-बोरीपार्धी गटात तुषार थोरात, कानगाव-गोपाळवाडी गटात साहेबराव पोळ, राहू-खामगाव गटात सागर शेलार, पाटस-कुरकुंभ गटात अनुराधा शितोळे हे सहाही जिल्हा परिषद गट आपल्याकडे खेचून आणत थोरातांनी जिल्हा परिषदेत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
पंचायत समिती निवडणुकीत मात्र सत्तासंतुलन वेगळे दिसून आले. 14 पैकी 8 जागा जिंकत आमदार राहुल कुल यांनी दौंड पंचायत समितीवर वर्चस्व प्रस्थापित केले, तर रमेश थोरात यांना 6 जागांवर समाधान मानावे लागले. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत 6 पैकी 5 जागा आणि पंचायत समितीच्या 12 पैकी तब्बल 11 जागा रमेश थोरात यांनी जिंकल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा निकाल पाहता जिल्हा परिषदेत थोरातांची पकड कायम असली, तरी पंचायत समितीत सत्तासमीकरण बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.
आगामी ग््राामपंचायत निवडणुका आता उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. आगामी काळातील येणाऱ्या ग््राामपंचायत निवडणुकांत आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात कोणती रणनीती आखतात आणि दौंड तालुक्यातील किती ग््राामपंचायतींवर आपली सत्ता खेचून आणणार, याकडे संपूर्ण दौंड तालुक्याचे लक्ष लागले आहे.
एकीकडे, जिल्हा परिषदेत निर्विवाद वर्चस्व, तर दुसरीकडे पंचायत समितीत सत्तासंघर्ष. दौंडच्या राजकारणात कुल विरुद्ध थोरात ही लढत आणखी धारदार होत चालली असून, पुढील काळात ग््राामपंचायत रणधुमाळीत या संघर्षाचे पडसाद अधिक तीवपणे उमटण्याची चिन्हे आहेत.
आ. कुल यांना मोठा धक्का
या निवडणुकीत आमदार राहुल कुल यांना जिल्हा परिषदस्तरावर मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. केवळ यवत-बोरीभडक गटात अविनाश कुदळे येथील एकमेव जागेवरच कुल यांना समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, राहुल कुल यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या राहू-खामगाव जिल्हा परिषद गटातच या वेळी राष्ट्रवादी काँग््रेासने सुरुंग लावत दणदणीत विजय मिळविला. मागील पंचवार्षिक निवडणुकीत या गटात कुल यांना एकमेव यश मिळाले होते; मात्र, या वेळी चित्र पूर्णपणे उलटले.
दौंड तालुका ठरणार अध्यक्षपदाचा दावेदार
पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित असल्याने दौंड तालुका या पदासाठी सध्या ठोस दावेदार मानला जात आहे. येथील सलग तिसऱ्यांदा निवडणुकीत विजयी झालेले वीरधवल जगदाळे, माजी आमदार रमेश थोरात यांचे पुत्र तुषार थोरात हे प्रमुख दावेदार असणार आहेत. दौंड तालुक्याच्या वाट्याला नेमके काय येते, हे पाहणे देखील महत्त्वपूर्ण असणार आहे.