

दीपेश सुराणा
पिंपरी : बाळाच्या जन्माचे पालकांकडून नियोजन केले जाते. त्यासाठी आवश्यक तयारीही करण्यात येते. मात्र, तातडीच्या परिस्थितीत अत्यावश्यक वैद्यकीय सेवेची मदत घ्यावी लागते. पुरेसे नियोजन केल्यानंतरही बर्याचदा रुग्णवाहिकेत बाळांचा जन्म झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागाच्या 108 रुग्णवाहिकेत गेल्या नऊ वर्षांमध्ये 7 हजार 682 बाळांचा जन्म झाला आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील ही परिस्थिती आहे.
रुग्णवाहिका सेवेचा उपयोग
महाराष्ट्रात, कोणत्याही लँडलाइन किंवा मोबाईल फोनवरून 108 या टोल फ्री क्रमांकावर डायल करून आपण आपत्कालीन वैद्यकीय सेवा अंतर्गत रुग्णवाहिका बोलावू शकतो. ही सेवा जनतेसाठी मोफत आहे. अपघात, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, वैद्यकीय तातडीची सेवा अथवा इतर आपत्कालीन परिस्थितीसाठी ही रुग्णवाहिका बोलावली जाऊ शकते. 108 रुग्णवाहिका सेवेत पुणे जिल्ह्यासाठी अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट (एएलएस) आणि बेसिक लाइफ सपोर्ट (बीएलएस) अशा दोन प्रकारच्या रुग्णवाहिकांची सेवा पुरविण्यात येते.
सेवा 24 तास उपलब्ध
ही सेवा 24 तास उपलब्ध आहे. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकाने 108 क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ही यंत्रणा रुग्णासाठी काही वेळेत उपलब्ध होते. या सेवेसाठी सुसज्ज आणि अद्ययावत नियंत्रण कक्ष आहे. टोल फ्री क्रमांकावरून नियंत्रण कक्षाकडे संपर्क साधला जातो. त्यानंतर नियंत्रण कक्षाकडून संबंधित परिसरातील जवळ असलेल्या रुग्णवाहिकेला मदतीसाठी सूचना केली जाते. त्यानुसार, रुग्णवाहिका तत्काळ दाखल होते. या रुग्णवाहिकेत स्पेशालिस्ट डॉक्टर, रुग्णासाठी आवश्यक सर्वसुविधा उपलब्ध आहेत.
पुणे जिल्ह्यातील साडेतीन हजार बाळांचा जन्म
शहरी तसेच ग्रामीण भागात रुग्णालयात प्रसूतीवर भर असतो. महिलांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असतानाच रुग्णवाहिकेत प्रसूती होते. अशा प्रकारे पुणे जिल्ह्यात जानेवारी 2014 ते जानेवारी 2023 अशा नऊ वर्षांच्या कालावधीत 3 हजार 459 बाळांचा जन्म झाला आहे.
15 लाखांपेक्षा अधिक रुग्णांना फायदा
आपत्कालीन वैद्यकीय सेवा म्हणून राज्याच्या कानाकोपर्यात 108 या रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध आहे. शहरी तसेच दुर्गम भागातील रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोहोचविण्यासाठी ही सेवा उपयुक्त आहे. त्यामुळे रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळून जीवदान मिळण्यास मदत होते. पुणे जिल्ह्यासाठी एकूण 82 रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पुणे विभागात पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात या रुग्णवाहिका सेवेचा गेल्या नऊ वर्षात विविध कारणांसाठी 15 लाख 42 हजार 87 इतक्या रुग्णांनी लाभ घेतला आहे. तर, एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या नऊ वर्षात 7 लाख 71 हजार 173 रुग्णांनी या सेवेचा फायदा घेतला आहे.
पुणे विभागात रुग्णवाहिकेमध्ये बालकांचा झालेला जन्म
(जानेवारी-2014 ते जानेवारी-2023)
जिल्हा बालकांची संख्या
पुणे 3459
सातारा 2012
सोलापूर 2211
पुणे विभाग एकूण 7682
महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा अंतर्गत 108 या टोल फ्री क्रमांकावर डायल करून आपत्कालीन वैद्यकीय सेवा अंतर्गत रुग्णवाहिका बोलाविता येते. महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात हलवित असताना रुग्णवाहिकेतच प्रसुती होऊन 7 हजार 682 बाळांचा जन्म झाला आहे. पुणे विभागातील गेल्या नऊ वर्षांतील ही परिस्थिती आहे.
– विठ्ठल बोडखे, विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा
(पुणे विभाग)