Market Update : पुण्यात फळभाज्यांची आवक घटली | पुढारी

Market Update : पुण्यात फळभाज्यांची आवक घटली

शंकर कवडे

पुणे : श्रीछत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेने कमी झाली होती. आवक घटल्याने भेंडी, गवार, फ्लॉवर, वांगी, सिमला मिरची, घेवड्याच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेने दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली होती. तर, आवक वाढल्याने कांदा, टोमॅटोचे भाव कमी झाले होते. इतर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेने टिकून होते.
गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी (दि. 17) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली.
भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात येथून हिरवी मिरची सुमारे 10 ते 12 टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून 2 ते 3 टेम्पो शेवगा, राजस्थान येथून 10 ते 12 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून
घेवडा 3 ते 4 टेम्पो, भुईमुग शेंग कर्नाटक येथून 2 टेम्पो, मध्य प्रदेश येथून 25 ट्रक मटार, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे 6 ते 7 टेम्पो आवक झाली होती.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 500 ते 600 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, टोमॅटो सुमारे 10 ते 12 हजार क्रेट्स, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 8 ते 10 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, सिमला मिरची 10 ते 12 टेम्पो, पावटा 4 ते 5 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा जूना आणि नवीन सुमारे 100 ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 30 ते 35 टेम्पो इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केटयार्ड येथील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

कोथिंबीर, मेथी, शेपू, चाकवत, करडई, मुळे, पुदिना महाग
रविवारी पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने कोथिंबीर, मेथी, शेपू, चाकवत, करडई, मुळे, पुदिना, चवळईच्या भावात वाढ झाली होती. रविवारी (दि.17) कोथिंबिरीची तब्बल 1 लाख जुडी, तर मेथीची 50 हजार जुडी इतकी आवक झाली. मेथीच्या भावात जुडीमागे 12 रुपये, शेपू 6 रुपये, मुळा 3 रुपये आणि कोथिंबीर, चाकवत, करडई, पुदिना, चवळईच्या भावात प्रत्येकी एक रुपयांनी वाढ झाली होती. तर, इतर सर्व पालेभाज्यांचे भाव स्थिर होते.पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : 800-1600, मेथी : 1200-2000, शेपू : 600-1200, कांदापात : 800-1500, चाकवत : 400-800, करडई : 300- 700, पुदिना : 300-800, अंबाडी : 400-700, मुळे : 800-1500, राजगिरा : 400-700, चुका : 400-800, चवळई : 400-700, पालक : 800-1500, हरभरा गड्डी: 600-1000.

Back to top button