Pune : विस्तार वाढला; गाड्यांचे काय?

Pune : विस्तार वाढला; गाड्यांचे काय?
Published on
Updated on

पुणे : पूर्वी पीएमपीच्या माध्यमातून पुणे, पिंपरी-चिंचवड या दोन शहरांना बससेवा पुरविली जात होती. आता पीएमआरडीए भागाचा विस्तार झाला. मात्र ती सेवा पुरविण्याचा बोझा पीएमपी प्रशासनावर वाढला आहे. पीएमपीकडील नव्या गाड्यांच्या संख्येत वाढ झालेली नाही. तसेच त्या भागात सुसज्ज डेपोंसाठी जागा व आर्थिक मदत अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे पीएमआरडीए प्रशासनाने पीएमपीला नव्या गाड्या खरेदीसाठी आणि सुसज्ज डेपो उभारण्यासाठी सर्वोतोपरी मदत करायला हवी, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
पीएमआरडीए प्रशासनाकडून नुकतीच पीएमपीला 188 कोटी रुपयांची संचलन तूट देण्यास सुरुवात झाली आहे. ही संचलन तूट मिळावी, याकरिता तत्कालीन सहव्यवस्थापकीय संचालक चेतना केरूरे, प्रज्ञा पोतदार यांनी मोठे प्रयत्न केले.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने पीएमपी प्रशासनाला पीएमआरडीएकडून ही संचलन तूट मिळण्यास सुरुवात झाली. त्याअगोदरपासूनच या भागात प्रवाशांसाठी पीएमपीची विनासंचलन तूट सेवा सुरू होती. परंतु, याचा आर्थिक बोझा प्रचंड वाढला होता. त्यामुळे तत्कालीन अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांच्या काळात काही काळ ग्रामीण व पीएमआरडीए भागातील मार्गावरील बस सेवा बंद करण्यात आली.

परिणामी, या भागातील शालेय विद्यार्थी, प्रवाशांचे हाल झाले. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मध्यस्थीने पीएमपीला पीएमआरडीएकडून संचलन तूट मिळाली. मात्र, या भागात प्रवाशांना आता पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असलेली सुसज्ज डेपोंसाठीची जागा अद्यापपर्यंत मिळालेली नाही. तसेच, या भागाकरिता अतिरिक्त नव्या गाड्यादेखील मिळालेल्या नाहीत. त्यामुळे पीएआरडीए प्रशासनाने पीएमपीला नव्या गाड्यांसह डेपोंसाठी जागा आणि ते उभारण्यासाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पीएमपी तज्ज्ञांकडून केली जात आहे.

24 टक्के सेवा पीएमआरडीए भागात
पीएमपीच्या एकूण बससेवेच्या 24 टक्के सेवा पीएमआरडीए भागात पुरविली जात आहे. या भागातील 113 मार्गांवर दररोज सुमारे 490 पेक्षा अधिक बस धावतात. त्यांच्या रोज 4 हजार 918 फेर्‍या होतात. त्याद्वारे 2 ते 3 लाख प्रवासी या भागातून प्रवास करतात. त्यांच्या माध्यमातून पीएमपीला सुमारे 35 ते 36 लाखांच्या घरात उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे पीएमपीला पीएमआरडीए सेवा पुरविण्यासाठी नव्या गाड्यांसह नऊ ठिकाणी डेपोंसाठी जागा हवी आहे.

पीएमपीला पास विक्रीतून पावणेचार कोटी…
पीएमपी प्रवासात तिकीटांसोबतच पासचा वापर करणार्‍या प्रवाशांमध्ये वाढ होत असून, गेल्या नोव्हेंबर महिन्यात पीएमपीला 3 कोटी 73 लाख 6 हजार 746 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाला काही प्रमाणात का होईना दिलासा मिळत असल्याचे दिसत आहे.

फक्त 1698 बस धावतात रस्त्यावर
पीएमपीच्या ताफ्यात 2 हजार 119 बस गाड्या आहेत. त्यापैकी 1698 गाड्या या दररोज मार्गावर असतात. उर्वरित गाड्या देखभाल, गाडी दुरुस्ती, पासिंग, ब—ेकडाऊन यांसारख्या विविध कारणांनी डेपोतच असतात. याच 1698 गाड्यांच्या माध्यमातून दररोज 12 लाख 88 हजार 896 प्रवासी प्रवास करतात. शहरातील बस पीएमआरडीए भागात धावत असल्याने पुणे व पिंपरी-चिंचवडकरांना बसगाड्या अपुर्‍या पडत आहेत. परिणामी, बस वेळेत मिळत नसल्याने पुणेकरांना स्वत:च्या दुचाकी, चारचाकी काढून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पीएमपीने ताफ्यातील मार्गावरील गाड्यांमध्ये आणखी वाढ करायला हवी, तसेच या वाढीनुसार मार्गावर साडेतीन हजारांच्या घरात बसगाड्या धावायला हव्यात, तरच शहरातील कोंडी कमी होणार असून, प्रवाशांना वेगवान बससेवा मिळणार आहे, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

तिकीट विक्रीतून 43 कोटी उत्पन्न
पीएमपी प्रशासनाला नोव्हेंबर 2023 या महिन्यात 43 कोटी 65 लाख 11 हजार 270 रुपये उत्पन्न मिळाले आहे. तिकीट विक्री, पास विक्री, पुणे दर्शन असे मिळून पीएमपीला नोव्हेंबर महिन्यात 47 कोटी 40 लाख 10 हजार 16 रुपये इतके उत्पन्न मिळाले. परंतु, ही रक्कम महिन्याच्या खर्चाच्या तुलनेत निम्मीच आहे. सर्व खर्च भागविण्यासाठी प्रशासनाला संचलन तुटीचा आधार हा घ्यावाच लागत आहे. त्यामुळे आता यापुढील काळात पीएमपीला स्वावलंबी बनवावे लागणार आहे, त्याकरिता पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते आणि सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर काय उपाययोजना करणार, हे पाहावे लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news