Pune : समाविष्ट गावांतील मोकाट श्वान मोजणार | पुढारी

Pune : समाविष्ट गावांतील मोकाट श्वान मोजणार

पुणे : पुढारी वृत्त्तसेवा :  महापालिकेच्या जुन्या हद्दीतील भटक्या कुत्र्यांची गणना केल्यानंतर आता समाविष्ट 34 गावांमधीलही भटक्या कुत्र्यांची गणना करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार असून, अंदाजे 25 लाखांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या कुत्र्यांच्या सर्वाधिक त्रास रात्री उशिरा कामावरून घरी जाणार्‍या आणि पहाटेच्या वेळी व्यायामासाठी घराबाहेर पडणार्‍यांना सहन करावा लागतो. त्यामुळे महापालिकेकडून कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांना पकडून नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते. त्यानंतर ते पकडलेल्या ठिकाणी सोडले जाते. या कामासाठी वेगवेगळ्या संस्थांची नियुक्ती केली जाते.

कुत्र्यांच्या नसबंदीवर महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येण्याचे नाव घेत नाही. तसेच नसबंदी केल्यानंतर गळ्यात पट्टा बांधलेल्या कुत्र्यांनाही पिले होत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे नसबंदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते शिवाय नगरसेवकांनी अनेकवेळा शहरात एकूण भटक्या कुत्र्यांची संख्या किती आहे, अशी विचारणा सभागृहामध्ये केल्यावर प्रशासनाला नेमकी संख्या सांगता आलेली नाही. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची गणना करण्याचा मुद्दा अनेकवेळा ऐरणीवर आला होता. महापालिकेने यापूर्वी 2018 मध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांची गणना केली होती. त्यामध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या 3 लाख 15 हजार होती. त्यानंतर आरोग्य विभागाने चार वर्षांनंतर तीन महिन्यांपूर्वी क्यू आर कोड सोलुशन्स या संस्थेकडून महापालिकेच्या जुन्या हद्दीतील भटक्या कुत्र्यांची गणना केली. त्यामध्ये 1 लाख 79 हजार 940 भटकी कुत्री असल्याचा अहवाल देण्यात आला.

त्यानंतर आता महापालिका हद्दीमध्ये समावेश झालेल्या 34 गावांमधील भटक्या कुत्र्यांची गणना केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या प्रभारी मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे-भोसले यांनी दिली.

Back to top button