पुणे: पुढारी वृत्तसेवा : दहा वर्षांपासून कामाला असणार्या कर्मचार्याचे संगनमत करून अपहरण केल्याच्या आरोपावरून वानवडी पोलिस ठाण्यात बिल्डर, सुपरवायजर आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम खुदीराम असे बेपत्ता झालेल्याचे नाव आहे. त्यांचे नातेवाइक मनसीकुमार खुदीराम (रा. बिहार, सध्या मगरपट्टा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिल्डर अशोक मिलापचंद जैन (58, शंकरशेठ रोड), ठेकेदार जोगींदर रामसुरज राम (42), बहारणराम रामबाद राम (32, सर्व रा. वानवडी), हंसा कुमार यादव (32) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मनसीकुमार यांनी आपल्या भावाच्या बेपत्ता झाल्याबद्दल न्यायालयात 156 (3) नुसार तक्रार केली होती. त्यावर न्यायालयाने गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश वानवडी पोलिसांना दिले होते. मनसीकुमार यांनी आपल्या भावाचे अपहरण झाल्याचा संशय आरोपींवर व्यक्त केला होता. तसेच ठेकेदार जोगींदर राम याच्याकडे काम करत असताना त्यांची नातेवाईक असलेली मुलगी दुसर्या मुलाबरोबर बोलत असल्याची तक्रार विक्रम खुदीराम याने केली होती. त्यावरून त्यांना मारहाण करून काटा काढण्याची धमकी दिली होती, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.