शेतरस्त्यांचा प्रश्न सुटेना; शेतकर्‍यांचे उद्या पेरू वाटप आंदोलन | पुढारी

शेतरस्त्यांचा प्रश्न सुटेना; शेतकर्‍यांचे उद्या पेरू वाटप आंदोलन

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : तहसीलदारांकडून शेतरस्त्यांचा प्रश्न सुटत नसल्याने सोमवारी (दि.18) जिल्हाधिकारी कार्यालयावर पेरू वाटप आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शरद पवळे व नाथा शिंदे यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील गावांत शेत रस्ते, शेत पाणंद रस्ते आणि शिव रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे त्यावरून वाहतूक करता येत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतीमध्ये पेरणी, मशागत व उत्पादित पीक वाहतूक, यासाठी यंत्रसामुग्री, ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडी, टेम्पो इत्यादी साधने शेतात नेणे अवघड होत चालले आहे.

शेतकर्‍यांनी यापूर्वी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांकडे शेती रस्त्यासाठी विनंती अर्ज दाखल केलेले आहेत. परंतु, तहसीलदार कोणत्याही प्रकारचा निर्णय देत नाहीत. महसूल अधिनियम 1966 च्या 143 कलम नुसार तहसीलदारांनी रस्ता उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. परंतु, कोणतीही कारवाई होत नाही. या कारणामुळे पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील शेतकरी शेत रस्ता व शिवपानंद रस्ता चळवळीचे प्रणेते शरदराव पवळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अ‍ॅड. प्रतीक्षा काळे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.

त्यावर तालुक्याच्या तहसीलदारांनी शेतकर्‍यांचा अर्ज आल्यानंतर 60 दिवसांमध्ये कारवाई करून शेतकर्‍यांना रस्ता उपलब्ध करून द्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. तरीही संबंधित तालुक्याचे तहसीलदार शेत रस्ता अतिक्रमणमुक्त करून देत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकरी शरद पवळे व नाथा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पेरू वाटप आंदोलन करणार आहेत. पीडित शेतकर्‍यांनी पेरू आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नाथा शिंदे, सागर सोनटक्के, बालेंद्र पोतदार, सतीश पटारे, अशोक ताके, संतोष शिंदे, गणेश शिंदे, कचरू शिंदे, अ‍ॅड. महेश जामदार, सुहास मापारी, संदीप आलवणे, डॉ. करणसिंह घुले यांनी केले आहे.

हेही वाचा

Back to top button