कडाक्याची थंडी ठरणार रब्बीसाठी पोषक | पुढारी

कडाक्याची थंडी ठरणार रब्बीसाठी पोषक

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : यंदा पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरीवर्गाला रब्बी हंगामाकडून आशा आहेत. हा हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. मागील चार-पाच दिवसांपासून, वातावरणात बदल होऊन थंडीचे प्रमाण वाढत चालले आहे. वाढती थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक ठरत आहे. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने रब्बी हंगामात थंडी पडेल की नाही, याबाबत शेतकरीवर्गात शंका होती.

डिसेंबरच्या मध्यावर पिकांना लाभदायक असलेली थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गहू, ज्वारी, हरभरा, मका आदी पिके सुस्थितीत येतील अशी आशा शेतक-यांनी व्यक्त केली. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी पिकांना थंडीचा मोठा फायदा होणार आहे. गहू, हरभरा, ज्वारी, मका या पिकांची वाढ जोमाने होण्यासाठी थंडी उपयुक्त ठरणार आहे.

फळ, फूल उत्पादकांना फटका

थंडीचा कडाका मागील काही दिवसांपासून वाढला आहे. यामुळे फळबागांसह, फूल उत्पादकांना फटका बसत आहे. पुरंदर तालुक्यात अंजिराचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर घेतले जाते. मात्र, थंडीचा कडाका वाढल्याने, अंजीर ‘उकलत’ आहे. उकललेले अंजीर कवडीमोल बाजारभावात विकावे लागत असल्याने, अंजीर उत्पादक शेतकर्‍यांस आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. तसेच फूल उत्पादकांनाही थंडीचा फटका बसत असून, फुले उमलण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. त्याचा फूल उत्पादकांना आर्थिक फटका बसण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा

Back to top button