कोल्हापुरात आणखी 17 एमएलडी एसटीपीसाठी प्रयत्न | पुढारी

कोल्हापुरात आणखी 17 एमएलडी एसटीपीसाठी प्रयत्न

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरात 123 एमएलडी सांडपाणी तयार होते. त्यापैकी 106 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे. उर्वरित 17 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प (एसटीपी) उभारण्यासाठी महापालिकेने प्रस्ताव तयार केले आहे. त्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

शंभर टक्के सांडपाणी रोखण्यासाठी प्रयत्न

कसबा बावडा, लाईन बाजार येथील 4 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण झाले. आ. जयश्री जाधव, प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ प्रमुख उपस्थित होते. पालकंमत्री मुश्रीफ म्हणाले, सद्य:स्थितीत जयंतीसह इतर नाल्यातून मिसळणारे सांडपाणी महापालिकेने निर्जंतुकीकरण करावे. पंचगंगा नदीपात्राजवळ 5 हजार लोकवस्ती असलेली 50 ते 60 गावे आहेत. त्यांनी एसटीपी तयार करावेत. महापालिकेनेही शंभर टक्के सांडपाणी रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याशिवाय ‘नमामि गंगा’ बघायला मिळणार नाही.

नवीन तीन एसटीपीचे प्रस्ताव

आ. जाधव म्हणाल्या, पंचगंगा प्रदूषणुक्त करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. वाढत्या शहरीकरणानुसार सांडपाणी प्रक्रिया केंद्रेही आवश्यक आहेत. अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी, महापालिकेने शहरातील इतर सांडपाणी रोखण्यासाठी तीन प्रस्ताव शासनाला सादर केले असून ते मंजूर व्हावेत. त्यानंतरच पंचगंगा प्रदूषणुक्त होईल, असे सांगितले. कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष राजू लाटकर, भाजपचे सत्यजित कदम, माजी महापौर स्वाती यवलुजे, राहुल चव्हाण, शहर अभियंता हर्षजित घाटगे उपस्थित होते. जलअभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी आभार मानले.

आणखी 6 एमएलडी एसटीपी मार्चपर्यंत पूर्ण

दुधाळी येथे आणखी 6 एमएलडी एसटीपीचे काम सुरू असून, मार्चपर्यंत ते काम पूर्ण होईल. अमृत योजना टप्पा 2 अंतर्गत 43 एलएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठीचे प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. ते पूर्ण झाल्यानंतर पंंचगंगेचे प्रदूषण थांबेल. झूम प्रकल्पात जमा होणार्‍या दररोजच्या कचर्‍यांवर महापालिकेच्यावतीने प्रक्रिया केली जात होती. आता त्यासाठी निविदा काढली असून, त्याचे काम अंतिम टप्यात आहे. शिल्लक कचर्‍यावर बायोमायनिंगसाठी मान्यता दिली आहे, असे प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी सांगितले.

Back to top button