टीडीआर घोटाळ्याची चौकशी करा: महाविकास आघाडीची मागणी | पुढारी

टीडीआर घोटाळ्याची चौकशी करा: महाविकास आघाडीची मागणी

पिंपरी : महापालिकेमध्ये कोट्यवधींचा टीडीआर घोटाळा झाला असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नुकताच केला आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गालगत वाकड परिसरातील मोक्याची दोन हेक्टर जागा केवळ 200 रुपये कोटींना महापालिकेने विकासकाला दिली आहे. आजच्या बाजारमूल्यानुसार यामध्ये तब्बल दीड हजार कोटींहून अधिक रकमेचा टीडीआर घोटाळा झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी महाविकास आघाडीने केली आहे. अन्यथा जनआंदोलनासह प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मोरवाडी, पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, गणेश भोंडवे, देवेंद्र तायडे, अनंत कोर्हाळे, संतोष सौंदणकर आदी उपस्थित होते.

तुषार कामठे म्हणाले, की भाजपने गेल्या सात वर्षांत महापालिकेत भ्रष्टाचार केला आहे. त्यात आयुक्त शेखर सिंह हे ही सामील आहेत. त्यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. गौतम चाबुकस्वार म्हणाले, की शहरांमध्ये तीनपैकी एकाही आमदाराने या घोटाळ्यावर विधिमंडळात आवाज उठवला नाही. ते गप्प का आहेत, त्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असून आमदार या घोटाळ्यात सहभागी आहेत का असा प्रश्न जनता विचारत आहे.

सचिन भोसले म्हणाले, की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे घोटाळा करण्यात आला आहे. यापूर्वीही शहरामध्ये टीडीआर घोटाळा झाले आहेत. सरकारने घोटाळ्याची सखोल चौकशी करून कारवाई करावी. कैलास कदम म्हणाले, की भाजपच्या मागील पाच वर्षांच्या सत्ता काळात स्थायी समिती अध्यक्षाला लाच घेताना रंगेहात पकडले होते. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भ्रष्टाचाराचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. भाजपचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत.

हेही वाचा

Back to top button