बोरीपार्धी ग्रा.पं.ने गटाराच्या पाण्यात टाकला मुरूम | पुढारी

बोरीपार्धी ग्रा.पं.ने गटाराच्या पाण्यात टाकला मुरूम

केडगाव : पुढारी वृत्तसेवा :  केडगाव रेल्वे स्थानकाच्या समोर साचलेल्या गटाराच्या पाण्याची बातमी दै. ‘पुढारी’त प्रकाशित होताच बोरीपार्धी (ता. दौंड) ग्रामपंचायतीला खडबडून जाग आली आणि दहा दिवस दुर्लक्षित केलेल्या गटारीच्या साचलेल्या पाण्यात तत्काळ मुरूम टाकून रस्ता करण्यात आला आहे. रेल्वे स्थानकासमोरच्या गटारीच्या पाण्याचा प्रश्न सोडवला असला, तरी मुख्य रस्त्यावर हे पाणी सोडण्याचे काम करून आणखी ताप वाढवला आहे.  या गावच्या गटार योजनेचे काम पाठीमागच्या काळात करण्यात आले होते.

मात्र ज्या विभागाच्या नियंत्रणाखाली काम करण्यात आले त्यांनी वाहून जाणार्‍या पाणी व्यवस्थेकडे लक्ष दिले नसल्याने पंडिता रमाबाई व्यापार संकुलाच्या इमारती पाठीमागे यातील सर्व घाण पाणी साचत होते. साचलेल्या पाण्याला पुढे वाट नसल्याने आणि पाणी मैलयुक्त असल्याने जमिनीत जागेवर मुरले जायचे या प्रकाराने जमिनीवर मैल्याचा थर निर्माण होऊन आणि जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया बंद पडली आणि पेठेत असणार्‍या गटारीच्या चेंबरमधून घाण पाण्याने मार्ग काढला. आज मार्केटच्या मुख्य रस्त्याच्या कडेने हे घाण पाणी पुढे जात आहे .

सुरुवातीला केडगाव रेल्वे स्थानकासमोर हे पाणी साचले होते, त्याचा प्रचंड त्रास स्थानकाकडे जाणार्‍या आणि येणार्‍या रेल्वे प्रवाशांना सोसावा लागला आणि उग्रवासाने या परिसरातील लहान-मोठ्या व्यावसायिकांसाठी समस्या झाली होती. याची दखल दै. ‘पुढारी’ मधून घेण्यात आली. ठळक मथळ्याखाली या विषयाचे वृत्त छापून आल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाला खडबडून जाग आली तत्काळ त्यांनी घाण पाण्याच्या साचलेल्या डबक्यात मुरूम भरून तेथील रस्ता व्यवस्थित केला. मात्र, मुख्य रस्त्याने येणार्‍या घाण पाण्याच्या प्रवाहाला त्यांनी सरळ वाट करून दिल्याने ते आता बाजारपेठेच्या मुख्य रस्त्याने पुढे सरकत आहे. साचलेल्या पाण्याचा हा उग्र दर्प या परिसरात येत असून, येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांना आणि त्या पट्ट्यात असलेल्या लहानसहान व्यावसायिकांना नकोसे झाले आहे. ग्रामपंचायतीचा हा प्रताप नागरिकांसाठी अडचणीचा झाला आहे.

Back to top button