मौजमजेसाठी दुचाकींच्या चोरीचा फंडा; अल्पवयीन मुलगा ताब्यात | पुढारी

मौजमजेसाठी दुचाकींच्या चोरीचा फंडा; अल्पवयीन मुलगा ताब्यात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मौजमजेसाठी दुचाकी चोरणार्‍या अल्पवयीन मुलाला मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलाने दुचाकी चोरीचे दहा गुन्हे केल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुचाकी चोरट्यांना पकडण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकार्‍यांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना दिल्या आहेत. मुंढवा भागात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी अल्पवयीन मुलगा दुचाकीवरून निघाला होता.

पोलिसांच्या पथकाला संशय आल्याने दुचाकीस्वार मुलाला थांबविले. पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशीत त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याने दुचाकी चोरीचे दहा गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले. अल्पवयीन मुलाकडून पावणेतीन लाख रुपयांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिस उपायुक्त आर. राजा, सहायक आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक संगीता रोकडे, सहायक निरीक्षक संदीप जोरे, दिनेश राणे, संतोष काळे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे, राहुल मोरे यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा

Back to top button