पौड रस्त्यावर धक्का ठरला वादाला कारण; तरुणाला बेदम मारहाण | पुढारी

पौड रस्त्यावर धक्का ठरला वादाला कारण; तरुणाला बेदम मारहाण

पुणे: पुढारी वृत्तसेवा : धक्का लागल्याने झालेल्या वादातून दोघांनी तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून बेदम मारहाण केल्याची घटना पौड रस्त्यावर घडली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोघांना अटक केली. सिद्धार्थ संजय मराठे (वय 26, रा. प्रतीकनगर, पौड रोड, कोथरूड) याला अटक केली असून, त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मनोज भाऊ भगत (रा. जयभवानीनगर, कोथरूड) याने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना 12 डिसेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास पौड रोडवरील म्हसोबा मंदिरासमोरील फूटपाथवर घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज याचा भाऊ पौड रस्त्याने निघाला होता. त्या वेळी आरोपी मराठेने मनोजच्या भावाला धक्का मारला. भावाने मराठेला जाब विचारला. तेव्हा मराठेने भावाला मारहाण केली. या घटनेनंतर मनोज तेथे गेला. भावाला का मारले ? अशी विचारणा केली. आरोपी मराठे आणि पाचंगणे यांनी त्याला शिवीगाळ केला.

’तू मोठा दादा झाला का? मला जाब विचारणारा तू कोण?’ अशी विचारणा करून मराठे आणि पाचंगणेने मनोजला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींनी त्याला मारहाण केली. आरोपींनी मनोजच्या डोक्यात गज मारल्याने तो जखमी झाला. ’याला आज जिवंत सोडायचे नाही,’ असे सांगून आरोपींनी दहशत माजविली. मनोजच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मराठे आणि पाचंगणे यांना अटक करण्यात आली असून, पोलिस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे तपासकरत आहेत.

हेही वाचा

Back to top button