डोंगरात पेटला कचरा! पालिकेचे डोळे बंद; नागरी आरोग्य धोक्यात | पुढारी

डोंगरात पेटला कचरा! पालिकेचे डोळे बंद; नागरी आरोग्य धोक्यात

कात्रज : पुढारी वृत्तसेवा : मनपा हद्दीतील येवलेवाडी पाझर तलावालगत डोंगरात प्लास्टिक, रबर व कचरा जाळला जात आहे. आग व धुराचे लोट उठून गुजर-निंबाळकरवाडी, टिळेकरनगर परिसरातील हवेचे प्रदूषण व दुर्गंधी निर्माण होत असून, नागरी आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येकडे पालिका आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे निसर्गरम्य परिसरात सातत्याने कचरा पेटविला जात असताना महापालिका मात्र, डोळ्यात धूळ पडल्यासारखी त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
या समस्येबाबत माजी नगरसेवक प्रकाश कदम यांनी मनपा आयुक्त यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.

येवलेवाडी पाझर तलावाजवळ डोंगरालगत गेल्या तीन-चार महिन्यांपासून कचरा, प्लास्टिक, रबर, स्क्रॅप व राडारोडा आणून टाकला जात आहे. तसेच तो पेटवून दिला जात आहे. या खड्ड्यातून आग व धुराचे लोट उठत असून येवलेवाडी, टिळेकरनगर, गुजर निंबाळकरवाडीकडे व पर्यायाने शहराकडे येत आहेत. सध्या थंडीमुळे धुराचे लोट उंच न जाता ठराविक उंचीपर्यंत राहतात. त्यामुळे फार मोठे प्रदूषण होत आहे.

प्रदूषणाच्या तक्रारीनंतर अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणण्यासाठी दोन वाहने पाठवली. मात्र, जागामालकांनी त्यांना अटकाव केला, अशी माहिती पालिकेने दिली. हे पालिकेचे उत्तर हास्यास्पद असून घराबाहेर, सोसायटीबाहेर किरकोळ कचरा पेटवला तरी कारवाई होते. नागरिकांच्या जिवाला धोका असताना पालिका कुणाला पाठीशी घालत आहे, असा सवाल उपस्थित करत तत्काळ कारवाई न झाल्यास तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा प्रकाश कदम यांनी दिला आहे.

हेही वाचा

Back to top button