पाणी अन् रस्त्यासाठी ढमाळवाडीत नागरिकांचा आक्रोश ! | पुढारी

पाणी अन् रस्त्यासाठी ढमाळवाडीत नागरिकांचा आक्रोश !

फुरसुंगी : पुढारी वृत्तसेवा : अपुर्‍या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या ढमाळवाडी, पापडेवस्ती येथील रहिवाशांनी महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ आंदोलन केले. रहिवाशांचा पाण्याचा व कचर्‍याचा प्रश्न येत्या 22 डिसेंबरपर्यंत न सोडविल्यास हडपसर क्षेत्रीय कार्यालयापुढे आंदोलन करण्याचा इशारा या वेळी आंदोलकांनी दिला आहे.

ढमाळवाडीत राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष चंद्रकांत ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भेकराईनगरसह पापडेवस्ती, ढमाळवाडी भागात सुमारे दहा हजार लोकसंख्येला सध्या चार-पाच दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. या भागातील रस्ते अरुंद असल्याने या ठिकाणी महापालिकेचे टँकरही पोचू शकत नसल्याने येथील रहिवाशांची पाण्यासाठी परवड सुरू आहे. याशिवाय कचरागाड्याही या परिसरात चार-पाच दिवस फिरकत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी कचर्‍याचे ढीग साठून अनारोग्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यांमुळे त्रस्त रहिवाशांनी ढमाळवाडीत सुमारे तासभर आंदोलन केले.

फुरसुंगीच्या इतर भागांत दोन दिवसांनी पाणीपुरवठा होत असताना ढमाळवाडी, पापडेवस्ती भागातील रहिवाशांना चार-पाच दिवसांनी पाणीपुरवठा होतो, हा कुठला न्याय आहे, असा संतप्त सवाल या वेळी आंदोलक महिलांनी केला. याप्रसंगी माजी नगरसेवक गणेश ढोरे हे उपस्थित होते. महापालिकेचे आरोग्य अधिकारी नरेंद्र आल्हाट, पाणीपुरवठा अभियंता निखिल गरड आदींनी आंदोलकांशी चर्चा केली. परिसरात लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल व कचर्‍याचा प्रश्नही सोडविण्याचे आश्वासन अधिकार्‍यांनी दिल्यानंतर रहिवाशांनी आंदोलन मागे घेतले.

हेही वाचा

Back to top button