दुष्काळ फक्त जाहीर; घोषणांचा पाऊस, अंमलबजावणी कधी ? | पुढारी

दुष्काळ फक्त जाहीर; घोषणांचा पाऊस, अंमलबजावणी कधी ?

लोणी-धामणी : पुढारी वृत्तसेवा : चालू वर्षी अपुरा पाऊस झाल्यामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक विभागांत दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. आंबेगाव तालुक्यात कळंब,मंचर,घोडेगाव,पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक या चार महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही दुष्काळी सवलती लागू झाल्या नाहीत. कधी लागू होणार आणि लाभ कधी मिळणार असा प्रश्न शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे. दुष्काळी घोषणा होऊनदेखील आवश्यक त्या सवलती मिळत नसल्याने शासनाची घोषणा मृगजळ ठरली आहे. यावर्षी पावसाच्या हुलकावणीमुळे खरीप हंगाम पूर्ण वाया गेला, तर शेती पिकांना मोठा फटका बसल्याने उत्पन्नात मोठी घट झाली आहे. रब्बी पाऊस झाला पिकेही आली, पण अवकाळने घात केला त्यामुळे रब्बी हंगामदेखील संकटात आला आहे.

अनेक भागांतील खरीप हंगामातील पेरा वाया गेला, उत्पन्न घटले असून, यासाठी आर्थिक मदत किती मिळणार याची शेतकर्‍यांना उत्सुकता आहे. जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन,शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात 33.5 टक्के सूट,शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी,आवश्यक तेथे टँकरने पाणीपुरवठा,टंचाई जाहीर केलेल्या गावातील वीजजोड खंडित न करणे, या सवलती द्याव्यात,अशी मागणी मांदळेवाडी, वडगावपीर, लोणी,खडकवाडी,वाळुंजनगर या अवकाळीग्रस्त भागातील शेतकर्‍यांनी केली आहे, तर पहाडदरा, शिरदाळे, धामणी या दुष्काळग्रस्त भागतील शेतकर्‍यांनी केली आहे.

लोणी धामणी परिसरात असणारा कायमचा दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात गोपालन व्यवसाय आहे. गारपिटीमुळे या भागातील शेतकर्‍यांचा चार्‍यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. पशुधन व्यवसाय अडचणीत आला असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या गावांच्या सवलती लागू करून संपूर्ण पीक कर्ज माफ केले पाहिजे.
                                                – मीरा पोखरकर, सरपंच, वडगावपीर.

मांदळेवाडी,वडगावपीर,लोणी,खडकवाडी,वाळुंजनगर आदी गावांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकरी हतबल झाला आहे. प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांनी शेतीच्या बांधांवर जाऊन पाहणी केली. परंतु शेतकर्‍यांना मदत मिळाली नाही. प्रत्यक्षात शेतकर्‍यांना मदत मिळणे गरजेचे आहे आणि ती मिळालीच पाहिजे.
                             -विठ्ठल ढगे पाटील, माजी उपाध्याक्ष, खरेदी-विक्री संघ, मंचर.

Back to top button