‘साहेब केसरी’ बैलगाडा शर्यतीमुळे खेडच्या राजकारणात भुरर्र | पुढारी

‘साहेब केसरी’ बैलगाडा शर्यतीमुळे खेडच्या राजकारणात भुरर्र

सुषमा नेहरकर-शिंदे

शिवनेरी : बारामतीसह संपूर्ण राज्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त फारसा जल्लोष दिसला नसताना खेड तालुक्यात मात्र राज्यातील सर्वांत मोठी साहेब केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक सुधीर मुंगसे यांच्या वतीने करण्यात आले आहे. खेड तालुक्यातील देशातील सर्वाधिक झपाट्याने विकसित होत असलेल्या चर्‍होली गावाच्या घाटात तब्बल पाच दिवस चालणार्‍या बैलगाडा शर्यतीत कोट्यवधी रुपयांची बक्षिसे वाटप करण्यात येणार आहेत. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी शरद पवार स्वतःच उपस्थित राहणार आहेत. या साहेब केसरी बैलगाडा शर्यतीमुळे खेडच्या राजकारणात कुणाची भुर्रर्रर्र होणार याची संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू आहे.

चर्‍होली खुर्द येथील साहेब केसरी बैलगाडा घाटात बुधवार (दि. 13) ते रविवार (दि. 17) या कालावधीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, पाच दिवसांत 712 बैलगाडा शर्यतीत भाग घेणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून मुंगसे यांनी तालुक्यात वेगळाच दबदबा निर्माण केला असून, भविष्यात शरद पवार गटाचे आमदारकीचे उमेदवार म्हणून मुंगसे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर यात सर्वाधिक धक्के बारामतीनंतर शरद पवार यांना शिरूर लोकसभा मतदार बसले. परंतु त्यांनी आपल्यासोबत राहिलेल्या जुन्याजाणत्यांना व सत्तेपासून दूर असलेल्या तरुण पिढीला सोबत घेऊन पुन्हा बांधणी सुरू केली आहे. आतापर्यंत सक्रिय राजकारणापासून दूर असलेले अनेक तरुण व उच्चशिक्षित चेहरे शरद पवार यांच्यासाठी राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून खेड तालुक्यातील विकसित व सर्वाधिक मतदार असलेल्या भागातून काही नवीन व तरुण चेहरे तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत.

अनेक दिग्गज शरद पवारांकडून इच्छुक
राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर खेड तालुक्यातील विद्यमान आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील बहुतेक सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आमदारांसोबत अजित पवार गटात समाविष्ट झाले. परंतु आजही तालुक्यात ग्रामीण भागात शरद पवार यांना मानणारा मोठा गट व मतदार आहे यांची सर्वांना जाणीव आहे. यामुळेच तालुक्यातील भाजपमधील काही, उध्दव शिवसेना गटाचे इच्छुक उमेदवार शरद पवार गटांकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु मुंगसे यांच्या रूपाने शरद पवार गटाला हक्काचा उमेदवार मिळू शकतो.

Back to top button