Pimpri News : दिशादर्शक बोर्ड अभावी वारकर्‍यांची होतेय फसगत | पुढारी

Pimpri News : दिशादर्शक बोर्ड अभावी वारकर्‍यांची होतेय फसगत

देहूगाव : पुढारी वृत्तसेवा : तीर्थक्षेत्र देहूगावमध्ये श्री संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी राज्याच्या काना-कोपर्‍यातून लाखो वारकरी, भाविकभक्त, देहूत येत असतात. येथे येणार्‍या वारकर्‍यांच्या माध्यमातून व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते; मात्र देहूगावात अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने वारकर्‍यांची फसगत होते. परिणामी, अनेकजण दुरूनच दर्शन घेऊन
मार्गस्थ होत असल्याने व्यावसायिकांना ग्राहकांच्या वाटेकडे डोळे लावून बसावे लागत आहे.

व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम

देहूगावात वैकुंठगमन सोहळा, पालखी प्रस्थान सोहळा, आषाढी आणि कार्तिकी अशा दोन एकादशीनिमित्त लाखो वारकरी येत असतात. या सोहळ्याप्रसंगी स्थानिक दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, प्रसाद विक्रेते, मिठाई विक्रेत्यांची आर्थिक उलाढाल होत असते. अनेक कुटुंबांची रोजीरोटी या व्यवसायावर अवलंबून आहे. देहूगाव ठाण्याच्या बाहेरून बायपास रस्ते झाल्याने येणारे वारकरी, भाविकही या रस्त्यांनी ये-जा करत असल्याने येथील व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे.

योग्य नियोजनाचा अभाव

शहराचा विकास होणे गरजेचे आहे; परंतु त्यासाठी योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असते. तसे नियोजन या ठिकाणी दिसून येत नाही. त्यामुळे स्थानिक गावठाण व परिसराला जे महत्त्व होते, ते राहिले नाही.

देहूगावमध्ये दोन बायपास रस्ते झाले आहेत; परंतु या रस्त्यांवर कुठेही मार्गदर्शक, दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. परिणामी बायपास रस्त्याने येणार्या भाविकांना मंदिर कुठे आहे, याविषयी माहिती मिळत नसल्याने भाविकांचा वेळ येथील ठिकाणे शोधण्यात जातो. परिणामी येथे येणारे भाविक लांबूनच दर्शन घेऊन आपल्या पुढील प्रवासात मार्गस्थ होत आहेत. याकडे देहूनगर पंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचे येथील व्यापारी, दुकानदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे याप्रश्नी संबंधित विभागाने विचार करून याविषयी योग्य नियोजन करण्याची मागणी स्थानिक व्यापारी आणि नागरिकांतून होत आहे.

– महेश मोरे, संत तुकाराम महाराजांचे वंशज

देहूगावमध्ये ठिकठिकाणी दिशादर्शक, मार्गदर्शक, सूचना फलक लावण्यासंदर्भात देहू नगरपंचायतीच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यावर लवकरच निर्णय होऊन तसे फलक लावण्यात येतील.

– संघपाल गायकवाड, अभियंता, देहू नगरपंचायत

हेही वाचा

Back to top button