पवना धरणात जूनअखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा | पुढारी

पवना धरणात जूनअखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणार्‍या मावळ तालुक्यातील पवना धरणात 82 टक्के पाणी साठा आहे. हा साठा पिंपरी-चिंचवड शहराला जून 2024 अखेरपर्यंत पुरणार आहे. त्यामुळे शहराला पाण्याबाबत फारशी चिंता करण्याची गरज नाही. मात्र, पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. राज्यातील अनेक भागात पुरेसा पाऊस न झाल्याने धरणे 100 टक्के भरलेली नाहीत. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने सर्व महापालिका व नगरपालिकेला केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहराची स्थिती जाणून घेण्यात आली.

शहरासाठी पवना धरणातून दररोज 510 एमएलडी पाणी रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातून उचलले जाते. त्या पाण्यावर निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून ते संपूर्ण शहराला पुरविले जाते. महापालिकेची पुरवठा व्यवस्था पुरेशी नसल्याने शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. दररोज पाणी देण्याबाबत राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र, दोन दिवसातून एकदा पाणी दिले जात आहे. हा पाणीपुरवठा दोन दिवस पुरेल इतका असतो. संपूर्ण शहराला समन्यायिक पाणी मिळावे म्हणून हे धोरण स्वीकारल्याचे महापालिकेचे मत आहे. शहराच्या दोन भागांमध्ये विभागून हे दिवसाआड पाणी दिले जाते.

पवना धरण 100 टक्के भरल्यानंतर दररोज पाणी देण्याची मागणी वाढली होती. मात्र, महापालिका आपल्या धोरणावर ठाम राहत दिवसाआड पाणी देत आहे. सध्या धरणात 82 टक्के पाणीसाठा आहे. हा साठा शहराला जून महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल इतका आहे. तसेच, आंद्रा धरणातून इंद्रायणी नदीच्या निघोजे बंधार्‍यात 75 एमएलडी पाणी चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नेले जात आहे. तेथे ते शुद्ध करून परिसराला दिले जात आहे. तसेच, एमआयडीसीकडून 20 एमएलडी शुद्ध पाणी महापालिका घेत आहे. शहराला दररोज 605 एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, काही सखल भागांमध्ये योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी कायम आहेत.

स्मार्ट सिटीला दोन दिवसातून एकवेळ पाणी

गेल्या चार वर्षांपासून पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीला दोन दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. वेगात लोकवस्ती वाढून लोकसंख्या वाढत असल्याने संपूर्ण शहराला एकाच वेळी पाणीपुरवठा करण्याची महापालिकेची क्षमता नाही. शहराच्या वाढत्या नागरीकरणाचा वेग लक्षात घेता पिंपरी-चिंचवड शहरासाठी अशुद्ध पाणीउपसा व शुद्धीकरण यंत्रणा तसेच, पाणीपुरवठा व्यवस्थापन सक्षम झालेले नाही. त्यामुळे 25 नोव्हेंबर 2019 पासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासंदर्भात शहरवासीयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पवना धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. पिंपरी-चिंचवड शहराला जून 2024 पर्यंत पुरेल इतके पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे शहराला आता सुरू असलेला पाणीपुरवठा कायम राहणार आहे. जलसंपदा विभागाकडून सूचना आल्यास आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

श्रीकांत सवणे, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका.

हेही वाचा

Back to top button