

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : दिघी-आळंदी वाहतूक विभागाच्या अख्त्यारीत येणार्या आळंदी पोलिस ठाण्याच्या 11 गावांमधील चिंबळी गाव सध्या वाहतूक व्यवस्थेच्या गैरसोयीचा सामना करत आहे. दररोज सायंकाळी येथील राजे छत्रपती चौकात उभे राहायलादेखील जागा नसते. वाहनचालकांसह पायी चालणार्यांनादेखील प्रचंड वाहतूक कोंडी सहन करावी लागते. रस्त्यावर बेशिस्त पार्किंग करत वाहनचालक चौकातच 'आवो जावो घर तुम्हारा' सारखे फिरत असतात. शिवाय दुकानदारांनी पार्किंगसाठी जागाच न ठेवल्याने वाहनचालक खुशाल रस्त्यावर वाहने पार्क करून निघून जातात. त्यामुळे अगोदरच अतिक्रमणाने अरुंद असलेला रस्ता अधिकच अरुंद होत एक बाजूने येणारी गाडीदेखील कशीबशी चालवावी लागते. बेशिस्त पार्किंग, सुरळीत वाहतूक आणि नो पार्किंगवर कारवाई करण्याकडे वाहतूक विभागाचे
दुर्लक्ष होत असून, वाहतूक विभागाकडून तातडीने या ठिकाणी कारवाई व्हावी, अशी मागणी चिंबळी ग्रामस्थांनी केली आहे.
वाहने जप्त करणार
ग्रामस्थांच्या तक्रारीची आळंदी-दिघी वाहतूक विभागाने तात्काळ दखल घेतली असून, पुढील आठ दिवसांत या ठिकाणच्या वाहतूक कोंडीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत वेळ आल्यास वाहन टोइंग करून जप्त केली जाणार आहेत, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली.