लुटारू गुंड आदर्श चौधरी टोळीवर मोक्का | पुढारी

लुटारू गुंड आदर्श चौधरी टोळीवर मोक्का

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  लोहगाव भागातील पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यांना कोयत्याचा धाक दाखवून रोकड लुटणार्‍या आदर्श चौधरी टोळीवर विमानतळ पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. आरोपींनी संघटित टोळी तयार करून संगनमताने गुन्हे केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. आदर्श अनिल चौधरी (21, रा. लोणावळा), आशुतोष संतोष साठे (22, रा. मुळशी), आकाश हरेंद्र शर्मा (19, रा. लोहगाव), राहुल नानाभाऊ तायडे (20, रा. मावळ), संजय मारुती चव्हाण (22, रा. मावळ) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

चौधरी हा टोळीप्रमुख आहे. 11 नोव्हेंबर रोजी लोहगाव भागातील पेट्रोल पंपावर आरोपींनी दरोडा टाकला. सायंकाळच्या सुमारास पंपावरील कर्मचारी कार्यालयात रोकड मोजत होते. या वेळी दुचाकीवरून आलेले आरोपी कार्यालयात शिरले. त्यानंतर कर्मचार्‍यांना कोयत्याचा धाक दाखवून 28 हजारांची रोकड चोरून नेली. तसेच कर्मचार्‍यांना धमकी देऊन मोबाईलचे नुकसान केले. गुन्हा केल्यानंतर पसार झालेल्या चौघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली. तर, संजय चव्हाण हा अद्याप फरार आहे. आरोपींच्या रेकॉर्डची तपासणी केली असता आरोपींवर गुन्हे दाखल असून, संघटित टोळी तयार करून आरोपी गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी आरोपींवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्यामार्फत पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे पाठविण्यात आला. शर्मा यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही 97 वी कारवाई आहे.

हेही वाचा :

Back to top button