… तर दि.25 पासून ऊसतोड बंद करणार | पुढारी

... तर दि.25 पासून ऊसतोड बंद करणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील प्रचलित ऊसतोड मजुरीच्या दरात पन्नास टक्क्यांनी वाढ करून हा दर प्रतीटन 410 रुपये करावा, अशी आमची मुख्य मागणी आहे. ही मागणी राज्य सहकारी साखर कारखाना संघाने तत्काळ मान्य न केल्यास येत्या 25 डिसेंबरपासून ऊसतोडणी बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार मुकादम व वाहतूक संघटनेच्या सात संघटनांनी संयुक्तरित्या घोषित केला आहे. राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या पदाधिकार्‍यांसमवेत गुरुवारी (दि. 14) साखर संकुल येथील कार्यालयात कामगार संघटनेच्या पदाधिका-यांसमवेत झालेली ऊसतोडणी मजुरी दरवाढीची चौथी संयुक्त बैठक निर्णयाविना फिस्कटली.

या बैठकीस राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांच्यासह कामगार संघटनांचे पदाधिका-यांमध्ये डॉ. डी. एल. कराड, दत्ता डहाके, सुखदेव सानप, प्रा. सुशीला मोराळे, दत्तात्रय भांगे, गहिनीनाथ थोरे पाटील आदींसह अन्य कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कामगार संघटनांचे डॉ. डी.एल. कराड व अन्य पदाधिकार्‍यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. प्रचलित मजुरीच्या दरात 50 टक्के वाढ करण्याची कामगार संघटनांची मागणी
साखर संघाबरोबरची संयुक्त चर्चा फिस्कटली.

अन्य राज्यांत अधिक दर

राज्यात 9 लाख ऊसतोड कामगार आहेत. ऊसतोडणी मजुरीचा दर हा गुजरातमध्ये प्रतीटनास 476 रुपये असून, अन्य राज्यांतही 400 रुपयांवर दर आहेत. महाराष्ट्रातही त्या पातळीपर्यंत दर आणावेत, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे.

राज्य सहकारी साखर कारखाना संघ आणि ऊसतोड कामगार संघटना मजुरी दरवाढीस प्रथमच बसलेले नाहीत. सध्या कोणताही तोडगा निघाला नसला, तरी पुन्हा बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू. जेणेकरून आंदोलनाची वेळ येणार नाही.

– जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, साखर कारखाना महासंघ.

हेही वाचा

Back to top button