

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : जुने संगणक व लॅपटॉप घेऊन जाणाऱ्या टेम्पोने अचानक पेट घेतला. ही घटना पुणे-सातारा महामार्गावर निगडे (ता. भोर) येथे घडली. प्रसंगावधान ओळखून चालकाने टेम्पो महामार्गावरून मोकळ्या जागेत नेल्याने अनर्थ टळला. मात्र, टेम्पोसह लाखोंचा मुद्देमाल बेचिराख झाला. मुंबई येथून संगणक व लॅपटॉप घेऊन चेन्नईकडे जाणारा टेम्पो (एमएच ४३ बीजी ०१६२) जात असताना निगडे येथे गुरुवारी (दि.१४) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. टेम्पोचालक अनिलकुमार वर्मा (वय २६, रा. उत्तरप्रदेश) याला आरशात टेम्पोतून धूर येत असल्याचे दिसले. पाठीमागून येणाऱ्या कारचालकानेदेखील टेम्पोला आग लागल्याचे सांगितले. टेम्पोचालकाने प्रसंगावधान राखत महामार्गावरून सेवा रस्त्याच्या बाजूला टेम्पो घेतला. आगीची माहिती मिळताच किकवी दूरक्षेत्र व वाहतूक शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या वेळी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, गाडी येईपर्यंत टेम्पो व त्यातील साहित्य जळून खाक झाले. आगीचे कारण समजू शकले नाही. याबाबत रात्री उशिरापर्यंत राजगड पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
हेही वाचा :