Pimpri News : ‘स्मार्ट सिटीचे शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे शोभेचे’ | पुढारी

Pimpri News : ‘स्मार्ट सिटीचे शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे शोभेचे’

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने शहरभरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, त्यातील 90 टक्के सीसीटीव्ही कॅमेरे हे नादुरुस्त आहेत. त्यांचा पोलिस तपासात काहीच उपयोग होत नाहीत. कॅमेरे निव्वळ दिखावू आहेत, अशी तक्रार सांगवी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अतुल शितोळे यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे तक्रार केली आहे. शितोळे यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी तसेच, महापालिकेच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

चौक, पदपथ, वर्दळीच्या ठिकाणी हे कॅमेरे आहेत. सांगवी पोलिस ठाण्यातील अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यातील 90 टक्के कॅमेरे बंद स्थितीत आहे. त्याच्या पोलिसांना काहीच उपयोग होत नाही. सोनसाखळी चोरी, घरफोडी, अपघात आदी गुन्ह्यांत त्या सीसीटीव्ही कॅमेर्याचा काहीच फायदा होत नाही. गुन्ह्याची उकल होण्यासाठी हे कॅमेरे निरुपयोगी ठरत आहे. त्यामुळे नाहक पोलिस विभाग बदनाम होत आहे. निव्वळ शोभेसाठी हे कॅमेरे आहेत, असा आरोप शितोळे यांनी केला आहे.

स्मार्ट सिटीच्या अधिकार्यांनी संगनमत करून केवळ ठेकेदाराला मलिदा मिळावा म्हणून हे कॅमेरे बसविले आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शहरात उभारलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहे की बंद हे तपासावे. वीजपुरवठा, टेडा प्रणाली उपलब्ध आहे किंवा नाही हे पाहावे. तांत्रिक बाबीची पूर्तता करून सर्व कॅमेरे सुरू करावेत. त्यांचे रेकॉर्डिंग किमान एक महिना उपलब्ध होईल, असे सेव्ह करून ठेवावे, अशी मागणी शितोळे यांनी केली आहे.

सर्व कॅमेरे बंद स्थितीत

सांगवी भागात एकाच दिवशी चार घरात चोर्या झाल्या. मात्र, सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याने तेथील रेकॉर्डिंग उपलब्ध झाले नाही. त्यामुळे पोलिसांना तपास करण्यात अडचणी येत आहेत. हे कॅमेरे केवळ शोभेचे ठरत आहेत, असे माजी नगरसेवक अतुल शितोळे
यांनी सांगितले.

हेही वाचा

 

 

Back to top button