मायानगरीतील अभिनेत्रींच्या मधाळ सौंदर्याचे रहस्य दडलेय पुण्यात! | पुढारी

मायानगरीतील अभिनेत्रींच्या मधाळ सौंदर्याचे रहस्य दडलेय पुण्यात!

पुणे : दिनेश गुप्ता

पुणे : दिनेश गुप्ता

मायानगरीतील रूपेरी पडद्यावर नाव कमावणार्‍या अभिनेत्रींच्या सौंदर्याचे रहस्य पुण्यातील मधाळ मधुमक्षिका पालन केंद्रांमध्ये दडलेय असा दावा केला तर कदाचित आश्चर्य वाटेल; पण हे खरे आहे.

सौंदर्य प्रसाधनांसह लैंगिक दोष दूर करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या औषधांतील ‘रॉयल जेली’ निर्मितीचे प्रशिक्षण याच केंद्रातून दिले जाते. या महागड्या पदार्थांची निर्मिती आतापर्यंत चीन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान, युरोपमध्येच होत असे. मात्र, पुण्यातील या केंद्राने संशोधन करून रॉयल जेली तयार केल्याने भारतीय अभिनेत्रींच्या सौंदर्याला ‘चार चाँद’ लागले आहेत. भारतीय चित्रपटातील अभिनेत्री वयस्क झाल्या, तरी त्यांची त्वचा तजेलदार असते आणि ती आणखी सौंदर्य खुलवत असते.

हे सौंदर्य टिकवण्यासाठी अभिनेत्रींना अत्यंत महागड्या व दुर्मीळ अशा ‘रॉयल जेली’चा वापर करावा लागतो. विदेशातून मागवला जाणारा हा ‘रॉयल जेली’ आपल्याकडे कसा तयार करता येईल, यावर पुण्यातील मधुमक्षिका पालन केंद्रात अभ्यास केला गेला.
जगातील सर्व खाद्यपदार्थांमध्ये ‘रॉयल जेली’ हे सर्वोत्कृष्ट पोषक ठरले आहे.

‘रॉयल जेली’चा उपयोग अन्न पदार्थ आणि सौंदर्यप्रसाधनांत केला जातो. मधमाशांमधील प्रथिनयुक्त पौष्टिक पदार्थ ‘रॉयल जेलीत’ मोठ्या प्रमाणात वापरला जातो. या जेलीत कर्बोदके, प्रथिने, तेलयुक्त अमिनो आम्ल जीवनसत्वे, विशेषत: ब जीवनसत्व, खनिजे व प्रतिजैविके हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यातील काही घटक मानवातील लैंगिक समस्येवर प्रभावी ठरत आहेत. जगभरात ’रॉयल जेली’ला मोठी मागणी आहे. यामुळेच ते महागडे आहे. केवळ ’रॉयल जेली’ निर्मितीसाठी मधमाशा पालन करणारे अनेक मधपाल पुढारलेल्या देशातून काम करीत असतात.

’रॉयल जेली’ निर्मितीचे तंत्र आता पुण्यासारख्या महानगरात विकसित झाले आहे. भारतात विदेशातून आयात केलेल्या ’एपीएस मेली फेरा’ या युरोपियन जातीच्या मधमाशांचा उपयोग केला जात आहे; तसेच पंजाब व उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ’रॉयल जेली’चे उत्पादन घेतले जात आहे.

तीन वर्षांत दोनशे जणांना प्रशिक्षण…

केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत मधमाशीपालन उद्योगांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. पुण्याच्या केंद्रामध्ये एक महिना, पंधरा दिवस कालावधीचे अभ्यासक्रम आहेत. त्यात तीन वर्षांत सुमारे दोनशे प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

मधमाशांतील राणीला मानाचे पान!

मधमाशांचे पोळ हे स्वतंत्र कॉलणी असते. पूर्ण व जोमदार वाढीसाठी कामकरी (वर्कर) मधमाशांना ’रॉयल जेली’चा पुरवठा फक्त पहिल्या तीन दिवसांपर्यंतच केला जातो. परंतु, राणी माशीची पूर्ण वाढ होईपर्यंत ’रॉयल जेली’ दिली जाते. त्यामुळेच राणीमाशी आपल्या दोन ते अडीच वर्षांच्या आयुष्यात सतत अंडी घालण्याचे काम करते. याच अंडीच्या स्त्रावातून ’रॉयल जेली’सारखा अत्यंत दुर्मिळ पदार्थ मिळतो. यामुळे राणी आळी महत्त्वाची असते.

’रॉयल जेली’चे मूळ तंत्र जपानी

या जेलीचे उत्पादनाचे तंत्र मुख्यत: जपानमध्ये 1940 मध्ये विकसित करण्यात आले होते. हा देश दरवर्षी साधारणपणे 400 मेट्रिक टन उत्पादन करतो. त्यानंतर चीन 600 मेट्रिक टन ऊस उत्पादन करणारा जगातील पहिला देश ठरला होता. त्यामुळे चीनमधून दरवर्षी 50 टक्के उत्पादन जपान आणि युरोपमध्ये निर्यात केले जात होते. आता भारतातही तंत्र विकसित झाल्यामुळे दुर्मिळ असे रॉयल जेली आयात करण्याची जास्त गरज भासत नाही.

पुण्यातील केंद्रांना औषध कंपन्यांकडून जास्त मागणी

सौंदर्यप्रसाधने व लैंगिक समस्या दूर करण्यासाठी महत्त्वाचा असलेला ’रॉयल जेली’ आपल्या कंपनीला मिळावा, यासाठी औषध कंपन्या आगाऊ बुकिंग करीत आहेत. अभिनेत्रीदेखील पुण्यातील केंद्रांतून जेली तयार करणार्‍या मधपालांची यादी मागवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Back to top button