Pune News : पाणी सोडणारे वॉलमन ‘वसुली भाई’च्या भूमिकेत | पुढारी

Pune News : पाणी सोडणारे वॉलमन ‘वसुली भाई’च्या भूमिकेत

धानोरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेला वेळेत कर देऊनही लोहगावकरांना हक्काच्या पाण्यासाठी ‘हप्ता’ द्यावा लागत आहे. टँकरच्या पाण्याचा महिन्याचा खर्च लाखांमध्ये आहे. हा खर्च वाचवण्यासाठी आणि नियमित व योग्य दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी हप्ता ठरवून द्यावा लागत असल्याची तक्रार लोहगावमध्ये सर्रास ऐकायला मिळत आहे.  उत्तरेश्वर रस्ता, कुतवळ कॉलनी, साठे वस्ती आदी परिसरात नियमित व योग्य दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी महिन्याला चार ते पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागतो.
काही ठिकाणी हप्ता चालू झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. हप्ता ठरवून देण्यासाठी संबंधितांशी बोलणी करण्याचा गंभीरपणे विचार चालू असल्याचे काही सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.  हप्ता देऊनही दोन ते तीन दिवसांतून केवळ तासभर पाणी येते. टँकरचे पाणी मागवावेच लागते. हप्त्याची ही रक्कम सोसायटी खर्चाच्या कोणत्या खात्यात टाकायची, असा प्रश्न सोसायटीच्या पदाधिकर्‍यांना पडला आहे. याबाबत माहिती देणारे नागरिक स्वतःच व सोसायटीचे नाव वर्तमानपत्रात न छापण्याची विनंती करीत होते. त्यामुळे सध्यातरी लोहगाव परिसरात पाणी सोडणार्‍यांचेच राज्य असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे विचारणा केली असता, सध्या ज्या भागात जुन्या जलवाहिन्या आहेत तिथे उपलब्धतेनुसार पाणीपुरवठा केला जात आहे. लवकरच 230 कोटी रुपयांची वर्क ऑर्डर निघणार आहे. त्यातून समान पाणीपुरवठ्यासाठी तेरा नवीन टाक्या बांधण्यात येणार आहेत. शक्य तिथे जलवाहिन्या टाकण्याचे काम चालू आहे. त्यामुळे येत्या काळात लोहगावचा पाणीप्रश्न सुटेल, असे उपअभियंता रवींद्र पाडळे यांनी सांगितले.
नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी परिसरातील सोसायट्यांकडून बेकायदेशीरपणे वसुली केली जात आहे. महापलिकेला कर देऊनही नागरिकांना हक्काच्या पाण्यासाठी हप्ते द्यावे लागत आहेत. लोहगावकरांची होणारी ही लूटमार थांबली पाहिजे.
-बंडू खांदवे,  शहर उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.
ज्या भागात जलवाहिन्या आहेत तिथे पाणीपुरवठा केला जातो. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कामे चालू आहेत. पाणीपुरवठ्यासाठी नागरिकाकडे पैशांची मागणी करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
– इंद्रभान रणदिवे,  अधीक्षक अभियंता,  पाणीपुरवठा विभाग. 
हेही वाचा

Back to top button