Pimpri News : स्मशानभूमितील लोखंडी सांगाड्याची दुरवस्था | पुढारी

Pimpri News : स्मशानभूमितील लोखंडी सांगाड्याची दुरवस्था

नवी सांगवी : पिंपळे गुरव येथील स्मशानभूमितील पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत असलेल्या सांगाड्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. कधी कोलमडून पडेल याची शाश्वती देता येणार नाही. तरीदेखील महापालिकेचे संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.

कर्मचार्‍यांनी केली तात्पुरती डागडुजी

दिवसेंदिवस पिंपळे गुरव येथील लोकसंख्येचे प्रमाण वाढत चालले आहे. पिंपळे गुरव परिसरदेखील स्मार्ट उपनगर म्हणून ओळखला जात आहे. येथे सोयी-सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे महापालिका अधिकारी डोळेझाक करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

तक्रारीकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

  • येथील सांगाड्याचा मूळ पाया भोवती सिमेंटचे आवरण असलेले गट्टू निखळून पडले आहेत. त्यामुळे मूळ पायाच धोकादायक ठरत आहे. याकडे संबंधित प्रशासन अधिकारी दुर्लक्ष करीत आहे.
  • याबाबत वारंवार तक्रार करूनही संबंधित अधिकारी केराची टोपली दाखवित आहे. येथील स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार करण्यात येत असलेल्या सरणावरील लोखंडी सांगाडे बदलून ते नव्याने टाकण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

सांगाड्याची जळून झाली झीज

स्मशानभूमीचादेखील कायापालट करून पालिकेकडून स्मार्ट स्मशानभूमी उभारण्यात आली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून लोखंडी सांगाड्याची दुरवस्था झाली आहे. येथे अंत्यसंस्कार करण्यात येत असलेल्या दोन लोखंडी सांगाड्याची जळून झीज झाली आहे. सद्यस्थितीत येथील कर्मचार्यांनी तात्पुरत्या स्वरूपात सांगाड्याच्या लोखंडी खांबांना तारेच्या सहाय्याने एकमेकांना बांधलेले पहावयास मिळत आहे. येथील दोन सांगाड्याची दुरवस्था झालेली असताना तसेच धोकादायक परिस्थितीत असतानादेखील पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जात आहेत.

पिंपळे गुरव परिसरात एकच स्मशानभूमी आहे. त्यामुळे गेली काही वर्ष लोखंडी सांगाडा तापून त्याची झीज झाली आहे. तसेच, धोकादायकही झाला आहे. तरीदेखील नाईलाजास्तव अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे सांगाड्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी.

– महेश जगताप, सामाजिक कार्यकर्ते

हेही वाचा

Back to top button