Fraud Case : शाळा सुरू करण्याच्या आमिषाने सव्वा कोटीची फसवणूक | पुढारी

Fraud Case : शाळा सुरू करण्याच्या आमिषाने सव्वा कोटीची फसवणूक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शाळा सुरू करण्याच्या आमिषाने एक कोटी 17 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्राचार्यांसह तिघांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सी. पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य शेफाली तिवारी, तन्मय शर्मा, रोहित भार्गव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पूर्णिमा मिलिंद कोठारी (वय 63, रा. उत्तम टॉवर, नगर रस्ता, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट 2019 ते 31 मार्च 2023 या कालावधीत घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सी. पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य शेफाली तिवारी आणि पूर्णिमा तिवारी यांचा परिचय आहे. आयुष्यमती ट्रस्टच्या संचालक असल्याची बतावणी तिवारी यांनी कोठारी यांच्याकडे केली होती. 2019 मध्ये तिवारी यांनी त्यांना आयुष्यमती ट्रस्टकडून कॅनरी इंटरनॅशनल हायस्कूल सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

येरवड्यातील शास्त्रीनगर परिसरात कॅनरी इंटरनॅशनल स्कूल सुरू करण्यात आले. शाळेत भागीदार म्हणून कोठारी यांना रक्कम गुंतविण्यास सांगण्यात आले. एक ते दोन वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष कोठारी यांना दाखविले. त्यानंतर तिवारी यांनी कोठारी यांच्याकडून एक कोटी 17 लाख 67 हजार 579 रुपये घेतले. कोठारी आणि त्यांचा मुलगा शाळेत 70 टक्के भागीदार होते. तिवारी यांनी त्यांना कोणतेही अधिकार दिले नाहीत. शाळेच्या बँक खात्यावर शैक्षणिक शुल्कापोटी जमा होणारा निधी तिवारी यांनी वापरला. पोलिस उपनिरीक्षक नांगरे तपास करत आहेत.

हेही वाचा

Back to top button