‘त्या’ मृतदेहांवर ‘डीएनए’ अहवालानंतरच अंत्यसंस्कार | पुढारी

'त्या' मृतदेहांवर ‘डीएनए’ अहवालानंतरच अंत्यसंस्कार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  तळवडे येथील स्पार्कल कॅन्डल बनविणार्‍या कारखान्यात लागलेल्या आगीत मृत झालेल्या आणि ओळख न पटलेल्या 6 महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या डीएनए चाचणीचा अहवाल अद्याप पुण्यातील न्यायवैद्यकवैज्ञानिक प्रयोगशाळेकडून आलेला नाही. त्यामुळे संबंधित महिलांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार होऊ शकलेले नाहीत. हा अहवाल सोमवारी (दि. 11) पोलिसांकडून मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित महिलांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले जातील. त्यानंतरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होऊ शकतील. सध्या हे मृतदेह महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.

मृतदेहांचे आणि नातेवाइकांच्या डीएनएचे नमुने पुण्यातील न्यायवैद्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
काही नागरिकांनी पैंजण, कानातील रिंगा यावरुन हा मृतदेह आपल्या नातेवाईक महिलेचा असल्याचे सांगितले; मात्र त्यांना खात्री देता येत नव्हती. त्यामुळे पोलिस प्रशासनाने मृतदेह आणि त्यांच्या नातेवाईकांचे डीएनए सॅम्पल घेतले आहेत.

सहा महिलांच्या मृतदेहांचे नमुने आणि 6 नातेवाइकांच्या डीएनए चाचणीचा अहवाल सोमवारी पोलिसांकडून मिळणार आहे. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येतील. सध्या हे मृतदेह वायसीएम रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आले आहेत.
 – डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय पदव्युत्तर संस्था, पिंपरी.

Back to top button