भोर तालुक्यात शिक्षकांची 279 पदे रिक्त ; 41 शाळांना शिक्षकच नाही | पुढारी

भोर तालुक्यात शिक्षकांची 279 पदे रिक्त ; 41 शाळांना शिक्षकच नाही

भोर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. जिल्हा परिषदेच्या 274 शाळांत शिक्षकांची 789 पदे मंजूर आहेत. यापैकी 279 पदे रिक्त आहेत. तर 41 शाळांवर शिक्षकच नाहीत. यामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा पट कमी होऊन शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. वरंध घाटात असणार्‍या उंबर्डे येथे सातवीपर्यंतची शाळा असून, 11 विद्यार्थी शिकत आहेत. या शाळेतील शिक्षकाची ऑगस्टमध्ये बदली झाली. तेव्हापासून या शाळेला पूर्णवेळ शिक्षक मिळालेला नाही. शिक्षण विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात एक एक महिन्यासाठी वेगवेगळ्या शिक्षकांची नेमणूक केली. परंतु, गेले पाच महिने या शाळेवरील नेमणूक केलेले शिक्षक कधी दांडी, तर कधी अर्धवेळ शाळा भरवत आहेत. शाळेत शिक्षक नसल्यावर मुले गावात फिरतात, असे उंबर्डे येथील ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामस्थांच्या वतीने शिक्षण विभागाला तसेच राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना याबाबत पत्र देण्यात आले आहे.

भोरच्या दुर्गम भागातील हिरडस मावळ, मळे भुतोंडे, वेळवंड खोर्‍यात शून्य शिक्षक असलेल्या व रिक्त पदे असलेल्या शाळांची संख्या जास्त आहे. ही रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे. उंबर्डे शाळेतील शिक्षक पद ऑगस्टपासून रिक्त असल्यापासून तीन शिक्षकांची नियुक्ती केली. परंतु, शिक्षक पूर्ण वेळ हजर नसतात. बर्‍याचवेळा शिक्षक 12 वाजता येतात आणि दोन वाजता निघून जातात. त्यामुळे मुलांचे नुकसान होत आहे. जिल्हा परिषदेने कायमस्वरूपी शिक्षकाची नेमणूक न केल्यास शाळेला टाळे ठोकू, असा इशारा माजी सरपंच मारुती उंब्राटकर यांनी दिला.

‘शून्य शिक्षक असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांचे नियोजन झाल्यानंतर उंबर्डे शाळेतील शिक्षकांचा कायमचा प्रश्न मार्गी लागेल. सध्या तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकाची नेमणूक केली आहे.‘
                                                          – गुणवंत इंगळे, केंद्रप्रमुख, शिरगाव.

बर्‍याच शाळेवरील शिक्षक वेळेवर हजर नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून येत आहेत. ग्रामीण भागातील मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने त्वरित शिक्षक भरती करणे गरजेचे आहे.
                                                     – रणजित शिवतरे, माजी उपाध्यक्ष, जि.प., पुणे.

Back to top button