

यवत : पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर महामार्गावर केडगावच्या हद्दीत झालेल्या अपघातात सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-सोलापूर महामार्गावर केडगाव हद्दीत सह्याद्री पत्रा कंपनीजवळ महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत केडगाव येथील पांडुरंग दत्तात्रय शेळके आणि कैलास दत्तात्रय शेळके (दोघांचे वय अंदाजे 50) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 10) सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत रविवारी रात्री उशिरापर्यंत यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सख्ख्या भावांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.