Pune : नव्या टर्मिनलच्या उद्‌घाटनाला मुहूर्त कधी? | पुढारी

Pune : नव्या टर्मिनलच्या उद्‌घाटनाला मुहूर्त कधी?

पुणे :  पुढारी वृत्तसेवा :  दिवसेंदिवस पुणे विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे येथील जुने टर्मिनल प्रवाशांच्या गर्दीने सध्या फुल्ल होत असून, प्रवाशांना अनेक असुविधांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे जुने टर्मिनल फुल्ल होत आहे, तर दुसरीकडे येथेच बांधलेले नवीन टर्मिनल तयार असून, खुले करण्यात येत नाही. त्यामुळे हे नवीन टर्मिनल कधी सुरू करणार, असा सवाल प्रवाशांकडून विमानतळ प्रशासनाला विचारला जात आहे.
लोहगाव येथील जुने टर्मिनल पुण्यातील प्रवाशांसाठी खूपच अपुरे पडत आहे. दररोज येथून 25 ते 30 हजारांच्या घरात प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने त्याला लागूनच येथे नवीन भव्य असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ टर्मिनल उभारले आहे. त्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, किरकोळ कामे सध्या सुरू आहेत. ही कामे उरकून तात्काळ नवीन टर्मिनल प्रवाशांसाठी सुरू करावे,अशी मागणी पुणेकरांकडून जोर धरत आहे. परंतु, प्रशासनाकडून त्याच्या उद्घाटनासाठी व्हीव्हीआयपींसाठी मुहूर्त पाहिला जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.
यापूर्वी विमानतळ प्रशासनाने नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्या अजिबात पाळल्या गेलेल्या नाहीत. हिवाळी अधिवेशनापूर्वी हे विमानतळ सुरू होणार असे वाटत  होते. मात्र, तसे न झाल्यामुळे प्रवाशांमध्ये निराशा वाढली आहे. आता तर प्रशासन उद्घाटनाबाबत चिडीचुप आहे, तारीख, पाहुण्यांचे नाव काहीही सांगत नाही. प्रशासनाने असे न करता प्रवाशांसाठी लवकरात लवकर हे टर्मिनल सुरू करावे.
                                                                                            – धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ.
नवीन टर्मिनलचे उद्घाटन करणे का थांबविले आहे, हे आम्हाला माहिती आहे. व्हीव्हीआयपी असलेल्या लोकांच्या हस्ते उद्घाटन करून विमानतळ प्रशासन काय सुचवू इच्छित आहे. येथून जाणार्‍या हजारो प्रवाशांचे अपुर्‍या सुविधांमुळे हाल होत आहेत. आतातरी प्रशासनाने येथून प्रवास करणार्‍या हजारो प्रवाशांचा विचार करून नवीन टर्मिनल सुरू करण्याच्या हालचाली कराव्यात.
                                                                      – अमित बागुल, सरचिटणीस, पुणे शहर जिल्हा काँग्रेस.
नव्या टर्मिनलवर  या सुविधा…
प्रवाशांना विमानापर्यंत पोचविणारे 5 नवीन मार्ग (पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज)
8 स्वयंचलित जिने (एस्केलेटर)
15 लिफ्ट
34 चेक-इन काउंटर
प्रवासी सामान वहन यंत्रणा
आगमन क्षेत्रात पाच कन्व्हेयर बेल्ट

Back to top button