स्मारक निर्मितीमध्ये जुन्या व आधुनिक काळाची सांगड घाला : छगन भुजबळ | पुढारी

स्मारक निर्मितीमध्ये जुन्या व आधुनिक काळाची सांगड घाला : छगन भुजबळ

पुणे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारक आधुनिक पद्धतीचे करतानाच त्याच्या दृश्य स्वरूपाची सावित्रीबाईंच्या काळात जसे असेल अशा जुन्या काळाशी सांगड घाला, असे निर्देश अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
राष्ट्रीय भिडेवाडा आणि महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विस्ताराच्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगर रचना विभागाचे संचालक अविनाश पाटील, सहसंचालक राजेंद्र पवार, महानगरपालिकेच्या अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे, कार्यकारी अभियंता सुनील मोहिते आदी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथे स्मारक उभारताना ती ‘सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा’ अशी वाटली पाहिजे. यासाठी स्पर्धात्मक स्वरूपात नामांकित वास्तुविशारदाकडून वेगवेगळे आराखडे तयार करून घ्यावेत. आराखड्यात शाळेच्या परिसरात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, फर्निचर, क्रीडांगण, दृकश्राव्य साधने, जुन्यापद्धतीचे दर्शनी भाग आदी बाबींचा विचार व्हावा. जागेचा विचार करता शाळेच्या इमारतीत उद्वाहकाची व्यवस्था करावी.

या परिसरात वाहनतळाची इतरत्र व्यवस्था करण्याच्यादृष्टीने चाचपणी करावी. स्पर्धात्मक युगाचा विचार करता या शाळेतून महिला अधिकारी घडविण्याच्या दृष्टीने शाळेची रचना व आधुनिक अभ्यासक्रमाबाबत महानगरपालिकेने चाचपणी करावी. महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आणि राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा यांना जोडणार्‍या मार्गाचे आरक्षण नगर रचना विभागाने लवकरात लवकर पूर्ण करावे. आरक्षण निश्चितीनंतर पुणे महानगरपालिकेने भूसंपादनाची कार्यवाही सुरू करावी. यासाठी लागणार्‍या निधीची मागणी राज्य शासनाकडे करावी. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button