

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : 'तोरणा खोर्यातील आरोग्य सेवा ठप्प,' असे वृत्त दैनिक 'पुढारी'मध्ये मंगळवारी (दि. 5) प्रसिद्ध होताच खडबडून जाग आलेल्या आरोग्य विभागाने पासली (ता. वेल्हे) येथील आरोग्य केंद्रात एका महिला डॉक्टरची नियुक्ती केली आहे. त्यामुळे तोरणा-अठरागाव मावळ खोर्यातील ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पासली आरोग्य केंद्राची सेवा डॉक्टरअभावी ठप्प पडली होती. शिपाईच डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करत असल्याचा गंभीर प्रकार सोमवारी (दि. 4) पुढे आला होता. याची दखल घेत वेल्हे तालुका पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. जयदीपकुमार कापशीकर यांनी पासली आरोग्य केंद्रात एका महिला डॉक्टरची नियुक्ती केली आहे.
संबंधित बातम्या :
रायगड जिल्ह्यालगतच्या केळद, कुंबळे, कुसारपेठ, भोर्डी आदी खेड्या-पाड्यांतील 10 हजारांवर रहिवासी पासली आरोग्य केंद्रावर अवलंबून आहेत. मात्र, डॉक्टरअभावी वारंवार पासली आरोग्य केंद्राची सेवा कोलमडत असल्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी वेल्हे तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पकंज शेळके यांना साकडे घातले होते. वेल्हे व भोर तालुक्यांतील डोंगरदर्यातील गोरगरीब रुग्ण पासली आरोग्य केंद्रावर अवलंबून आहेत. दुर्गम भागात खासगी डॉक्टर येत नाहीत. आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने दूर अंतरावर वेल्हे, नसरापूर येथे जावे लागते.
दळणवळणाचे साधनही मिळत नसल्याने गंभीर रुग्णांचे उपचाराअभावी मृत्यू होत आहेत, असे केळदचे माजी सरपंच रमेश शिंदे यांनी सांगितले. तर नियमित डॉक्टरअभावी खेड्या-पाड्यांतील रुग्णांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी कायमस्वरूपी डॉक्टर, पुरेसे कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत, अशी मागणी पासली येथील किसन घाटे यांनी केली आहे.
पासली केंद्रात डॉक्टर, कर्मचारी उपस्थित राहावेत यासाठी संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत.
– पंकज शेळके, गटविकास अधिकारी, वेल्हेनागरिकांना 24 तास आरोग्य सेवा मिळावी यासाठी पासली आरोग्य केंद्रात दुसर्या वैद्यकीय अधिकार्याची नियुक्ती केली आहे. ते 10 डिसेंबरपर्यंत रुजू होणार आहेत.
– डॉ. जयदीपकुमर कापशीकर, तालुका आरोग्य अधिकारी, वेल्हे