Pimpri News : प्राधिकरण बनले समस्यांचे माहेरघर ! | पुढारी

Pimpri News : प्राधिकरण बनले समस्यांचे माहेरघर !

आकुर्डी : पुढारी वृत्तसेवा : स्मार्ट पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी, निगडी प्राधिकरण येथील भाग समस्यांचे माहेरघर बनले आहे. महापालिकेने याची वेळीच दखल न घेतल्याने ज्येष्ठांनीच आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन समस्यांचा पाढाच वाचून दाखवला. तसेच, त्यासंदर्भात निवेदनही दिले. प्राधिकरण निगडी येथील ज्येष्ठ नागरिक संघात सुमारे पंधराशे सभासद आहेत. अनेक दिवसांपासून भेडसावत असणार्‍या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी आयुक्तांची भेट घेऊन ती सोडविण्याची मागणी केली. आयुक्त शेखर सिंह यांनी या समस्यांचे निराकरण करण्यासंबंधी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा अर्चना वर्टिकर यांनी सांगितले. या वेळी सूर्यकांत मुथियान, माजी महापौर आर. एस. कुमार, श्यामसुंदर परदेशी, सुभाष जोशी, आदी उपस्थित होते.

फूटपाथावरच भाजी विक्रेत्यांचा ठिय्या

प्राधिकरणातील काही पदपथांवर भाजी विक्रेत्यांनी तसेच फुलवाले, पंक्चरवाल्यांनी जागा अडवून दुकाने थाटली आहेत. त्यामुळे पादचार्‍यांना मुख्य रस्त्यावरून जाण्याखेरीज पर्याय उरत नाही. त्यामुळे ज्येष्ठांना अपघातास सामोरे जावे लागत आहे.

अनधिकृत हातगाड्यांची डोकेदुखी

प्राधिकरणात फूटपाथवरच वेगवेगळ्या ठिकाणी हातगाड्या लावलेल्या दिसत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरुनच चालावे लागत आहे. त्याचबरोबर बंद हातगाड्या, टेबल इत्यादी सामान तेथेच ठेवून कुलूपबंद असते. सप्टेंबर महिन्यात यासंदर्भात कारवाई होणार होती; मात्र अद्याप ती झाली नाही.

पेठ क्रमांक 27 मधील भाजी मंडई पूर्ववत करावी

  •  या ठिकाणी भाजी मंडई बांधली आहे; परंतु येथे एकही भाजीचे दुकान नसून, येथे दुचाकी आणि चारचाकी वाहनांची दुरुस्ती केंद्र म्हणजेच गॅरेज तयार झाले आहे. प्राधिकरणातील सर्वच रस्त्यांवर भटकी कुत्रे मोठ्या प्रमाणावर कळपा कळपाने वावरत आहेत. रस्त्यांवरून जाताना तसेच रात्री-अपरात्री हे कुत्री अंगावर धावून येतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून चालणे असुरक्षित झाले आहे. तसेच पाळीव कुत्र्यांकरिता सार्वजनिक ठिकाणे तसेच रस्ते विष्ठा विसर्जन केंद्रे झाली आहेत. त्यामुळेही नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

प्राधिकरणात रुग्णालय निर्माण करा

  •  प्राधिकरणात महापालिकेचे एकही रुग्णालय नसल्याने नागरिकांना खासगी रुग्णालयात जावे लागते. ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्नाचे साधन नसल्याने त्यांना नातेवाइकांवरच विसंबून राहावे लागते. प्राधिकरणातील कला केंद्राच्या ठिकाणी मोठा खड्डा केला आहे. तेथे डासांचा मोठ्या प्रमाणावर पादुर्भाव झाला आहे. हिवताप, डेंग्यू, चिकणगुणिया यासारखा आजार फैलावत असल्याने सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्राधिकरणात रुग्णालय निर्माण करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

जप्त केलेल्या वाहनांचा बंदोबस्त इतर ठिकाणी करावा

निगडी पोलिस ठाणे हद्दीत जप्त केलेली शेकडो वाहने अनेक वर्षांपासून पडून आहेत. वाहनांचा तीन ते चार मजली थर जमा झाला आहे. त्याखाली भटके कुत्रे, मांजर, उंदीर, घुशींनी घर केले असून तेथेच अनेक प्राणी मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येथील जप्त केलेल्या वाहनांचा बंदोबस्त इतर ठिकाणी करावा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

अ प्रभाग कार्यालयात अपुरी पार्किंग व्यवस्था

अ प्रभाग कार्यालयात अपुरी पार्किंग व्यवस्था असल्याने येथे येणार्‍या नागरिकांना गाडी इतर ठिकाणी लावावी लागते. या कार्यालयात सतत कोणी ना कोणी येत असल्याने तसेच हा भाग वर्दळीचा असल्याने वाहने लावायला जागा राहत नाही. तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावली जातात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना व्यवस्थित चालताही येत नाही.

हेही वाचा

Back to top button