Pimpri News : दोन वर्षे उलटूनही रस्त्याचे काम पूर्ण होईना | पुढारी

Pimpri News : दोन वर्षे उलटूनही रस्त्याचे काम पूर्ण होईना

कार्ला : पुढारी वृत्तसेवा : कार्ला फाटा ते वेहेरगाव येथील गेली दोन वर्षांपासून सुरू असलेल्या मुख्य रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण असल्यामुळे स्थानिक व देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येत्या चैत्य पौर्णिमेच्या अगोदर रस्त्याचे काम पूर्ण होईल का? असा सवाल स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

भाविकांना फटका

मागील दोन वर्षांपूर्वी आमदार सुनील शेळके यांनी या रस्त्यासाठी 2.50 कोटी निधी उपलब्ध करून दिला होता. दोन वर्ष उलटूनही या रस्त्याचे काम अपूर्ण असून, येत्या चैत्य पौर्णिमेच्या आई एकवीरा जत्रेमध्ये भाविक व स्थानिक व्यावसायिक यांना वाहतूककोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. तसेच, येथील स्थानिक व्यावसायिकांनाही आर्थिक फटका बसणार आहे.

चैत्री यात्रेअगोदर रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी

आमदार शेळके यांनी रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु, दोन वर्ष
उलटूनही या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण का झाले नाही. तसेच, नव्याने सुरू असलेल्या रस्त्यावर तडे गेले असून हा रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याचेही नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. रस्ता हा चैत्री यात्रे आधी पूर्ण व्हावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

संपूर्ण उदरनिर्वाह हा रिक्षा व्यवसायावर अवलंबून आहे. कार्ला फाटा ते वेहेरगाव असा व्यवसाय आम्ही करतो आणि हा व्यवसाय सुट्टीच्या दिवशीच ग्राहक जास्त असल्यामुळे होत असतो. परंतु, रस्त्याचे काम मागील काही वर्षांपासून अपूर्ण असल्यामुळे येथील मार्गांवर वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे आमच्या व्यवसायाला चापखिळ बसली आहे

– शंकर हुलावळे, रिक्षा चालक

या रस्त्यासाठी महविकास आघाडी सरकारने 25 कोटी निधी उपलब्ध करून दिला होता. हे काम संथ गतीने सुरू असून दोन वर्षे उलटून ही हे काम अद्याप पूर्ण नाही. याचा स्थानिक नागरिक व भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय रस्त्याचे आत्तापर्यंत झालेले काम हे निकृष्ट दर्जाचे असून, त्याबाबत खासदार बारणे यांनी नाराजी व्यक्त करत दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे मागील आठवड्यात मावळच्या आढावा बैठकीत सांगितले होते.

– अशोक कुटे, तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

हेही वाचा

Back to top button