

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : समस्त आळंदीकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिलगिरी व्यक्त केली. आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांची नियुक्ती व्हावी, या मागणीसाठी आक्रमक झालेल्या आळंदी ग्रामस्थांबद्दल आणि त्यांच्या मागणीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना देसाई यांनी आळंदीकर म्हणून देवस्थानला मदत काय आहे, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा आळंदीकरांनी मोर्चा काढत निषेध केला होता. त्यावर आता दिलगिरी व्यक्त करत असल्याचे देसाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आळंदी ग्रामस्थांच्या संदर्भात रविवारी (दि. 3) माझ्याकडून अनवधानाने काही विधाने व्यक्त केली गेली. त्यामुळे आळंदी ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास त्याबद्दल समस्त आळंदीकरांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, असे देसाई यांनी म्हटले आहे. दरम्यान देसाईंच्या दिलगिरीनंतर आळंदीकर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.