Pune : सिंहगड भागात रानडुकरांचा हैदोस | पुढारी

Pune : सिंहगड भागात रानडुकरांचा हैदोस

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड किल्ला परिसरासह पश्चिम हवेली, पानशेत भागात रानडुकरांनी शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. रानडुकरांचे कळप हातातोंडाशी आलेली भात पिके रातोरात भुईसपाट करीत आहेत. अवकाळी पावसातून वाचलेल्या भात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवाने सिंहगड पायथ्याच्या खामगाव मावळ, मोगरवाडी, दुरुपदरा, चांदेवाडी, कोंडगाव, सोनापूर, आंबी आदी ठिकाणची भातपिके जमीनदोस्त झाली आहेत. 15 ते 20 रानडुकरे एका कळपात आहेत. सिंहगड-पानशेतच्या दर्‍याखोर्‍यात रानडुकरांचे असे 4 ते 5 कळप आहेत. याशिवाय मोकाट जनावरेही आहेत.

नुकसानभरपाई मिळावी
बाबूराव जानकर, श्रीहरी दारवटकर, वसंत जरांडे, निवृत्ती गांडले, सुरेश दारवटकर, अशोक दारवटकर, सुरेश करंजावणे, लक्ष्मण दारवटकर, प्रशांत दारवटकर, विलास दारवटकर, दिनकर जानकर आदी शेतकर्‍यांची भात पिके रानडुकरांनी भुईसपाट केली आहेत. वन विभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी या शेतकर्‍यांनी केली आहे.

खामगाव मावळ, मोगरवाडी, सिंहगड भागात रानडुकरांनी भात पिकांचे नुकसान केल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे. नुकसानभरपाईसाठी ऑनलाइन तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले. मात्र, अद्याप एकाही शेतकर्‍याने तक्रार केलेली नाही. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी पुन्हा ऑनलाइन तक्रार करावी.
                    -समाधान पाटील, वनपरिमंडल अधिकारी, सिंहगड वन विभाग

हातातोंडाशी आलेल्या भात पिकांत शिरून रातोरात रानडुकरांचे कळप उभी शेतपिके फस्त करीत आहेत. रानडुकरांच्या हैदोसाने पिके जमीनदोस्त झाली आहेत. अवकाळी पावसातून वाचलेली पिके रानडुकरांनी फस्त केल्याने हाती भाताचा दाणाही लागणार नाही.
                                                 – लक्ष्मण दारवटकर, शेतकरी, मोगरवाडी

आंबी शिवारात रानडुकरांप्रमाणे मोकाट गाय-बैलांचे कळप हैदोस घालत आहेत. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची कोणतीही यंत्रणा नसल्याने निम्मीहून अधिक शेती नापिक राहिली आहे.
                                                    -शंकर निवंगुणे, शेतकरी, आंबी.

Back to top button