

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : झेंडू फुलांच्या बाजारभावात सध्या वाढ झाली आहे. यंदा श्रावण महिना, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच दिवाळी सणात झेंडूच्या फुलांना बाजारभाव मिळालाच नाही. आता बाजारभावात थोडी वाढ झाली आहे. पुढील मार्गशीर्ष महिन्यात व—तवैकल्ये, पूजा, इतर धार्मिक कार्यक्रमांमुळे फुलांच्या बाजारभावात आणखी वाढ होईल, अशी आशा शेतकर्यांना आहे.
संबंधित बातम्या :
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात थोरांदळे, रांजणी, नागापूर, शिंगवे, वळती, पारगाव आदी परिसरात फूल उत्पादक शेतकरी अधिक आहेत. कोरोना संकटानंतर गेल्या तीन वर्षांमध्ये फुलांना बाजारभावाची साथ मिळालीच नाही. यंदा श्रावण महिना, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळीमध्ये झेंडूच्या फुलांना चांगला बाजारभाव मिळालाच नाही. अनेक शेतकर्यांना फुलांचे पीक सोडून द्यावे लागले होते. फुलांच्या पिकासाठी गुंतविलेले भांडवल देखील वसूल झाले नाही. त्यामुळे अनेक शेतकर्यांनी फुलांच्या बागा उपटून टाकल्या. तुळशी विवाहानंतर लग्नसराईला सुरुवात होते. त्यामुळे फुलांना मागणी देखील वाढते. आता गेल्या 15 दिवसांपासून झेंडूच्या फुलांच्या बाजारभावात वाढ झाली आहे.
सध्या 35 ते 40 रुपये दर झेंडूच्या फुलांना मिळत आहे. हा बाजारभाव चांगला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.निसर्गाच्या लहरीपणाचा फटका आधीच बाजारभावाची बोंब त्यात निसर्गाच्या लहरीपणाचाही फटका झेंडूच्या पिकाला बसत आहे. मागील आठवड्यात नागापूर, थोरांदळे, रांजणी, वळती परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे फुलांच्या झाडांचे नुकसान झाले. रोज ढगाळ हवामान आणि दाट धुके परिसरात पडत आहे. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव फुलांवर होत असल्याचे माजी कृषी अधिकारी कारभारी बबन वाघ यांनी सांगितले.
मार्गशीर्ष महिन्यामुळे झेंडूच्या फुलांच्या बाजारभावात वाढ झाली आहे. सध्या सुरू झालेली लग्नसराई तसेच पुढील मार्गशीर्ष महिना. यामुळे बाजारभावात आणखी वाढ निश्चित होणार आहे. त्यानंतर पौष महिन्यापासून यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे फुलांच्या बाजारभावात आणखी वाढ होऊन दर स्थिरावतील.
पवन वाघ, झेंडू उत्पादक शेतकरी