कोणाचा कार्यक्रम करायचा, हे खासगीत ठरतं : हर्षवर्धन पाटील | पुढारी

कोणाचा कार्यक्रम करायचा, हे खासगीत ठरतं : हर्षवर्धन पाटील

वारजे : पुढारी वृत्तसेवा : राजकारण आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. या आधी राजकारणात कधीच कोण कोणत्या पक्षाचा, हे पाहिले जात नसे. सध्या राजकारणातील मैत्री गायब होत चालली असून, पूर्वीच्या या मैत्रीची जागा कटुतेने घेतली आहे. परिणामी, सध्या राजकारणात कोणाचा कधीही करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो, असे वक्तव्य माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. सध्या कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा, हे आधी खासगीत ठरतं, असा दावाही त्यांनी या वेळी केला.

पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती स्व. रामभाऊ बराटे मित्रपरिवाराच्या वतीने दिला जाणारा यंदाचा स्व. ’रामभाऊ बराटे आदर्श कार्यकर्ता’ पुरस्कार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांना, तर ’जीवनगौरव’ पुरस्कार कीर्तनकार चंद्रकांत वांजळे महाराज यांना हर्षवर्धन पाटील व माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पगडी आणि रोख रक्कम, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, माजी आमदार संभाजी कुंजीर, बापूसाहेब पठारे, माजी नगरसेवक विकास दांगट पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन बराटे, मुरलीधर निंबाळकर आदी उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले की, आज कोण कोणत्या पक्षात आहे, त्याचा विचार करा, उद्याचा नको. कोण कोणत्या पक्षात जातील, ते सांगता येणार नाही. पण, कोणाचा ’करेक्ट’ कार्यक्रम करायचा असेल, तर तो आज केला जातो, असे राजकारणामागील खरे राजकारण झाले आहे. उल्हास पवार म्हणाले की, आज काळ कमालीचा बदलला आहे. सध्याची पिढी ही चिंतन करणारी आहे. पण, काळ कितीही बदलला तरी आजही आई ही संस्कारांचे, तर वडील हे संघर्षाचे विद्यापीठ आहे. जालिंदर कामठे यांनी प्रास्ताविक केले. मुरली निंबाळकर यांनी आभार मानले.

हेही वाचा

Back to top button