धारावी प्रकल्पाच्या अटी-शर्ती उद्धव ठाकरे सरकारनेच ठरविल्या : देवेंद्र फडणवीस | पुढारी

धारावी प्रकल्पाच्या अटी-शर्ती उद्धव ठाकरे सरकारनेच ठरविल्या : देवेंद्र फडणवीस

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे हे कायमच प्रकल्पांना विरोध करत आले आहेत. आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाला उद्धव ठाकरे विरोध करत असले तरी त्यांच्या सरकारच्या काळातच या प्रकल्पाच्या अटी-शर्ती ठरल्या. त्यामध्ये आम्ही कोणतेही बदल केलेले नाहीत. या प्रकल्पातून अदानींना मिळणारा टीडीआर ठाकरेंनी गुप्त ठेवला होता, तो आम्ही खुला केला, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर चढविला.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कंत्राट गौतम अदानी यांच्या कंपनीला देण्यात आले असून त्याला विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 16 तारखेला अदानी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकार आणि विरोधकांमध्ये राजकारण पेटण्याची शक्यता असताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनीच प्रकल्पाच्या अटीशर्ती निश्चित केल्याचा आरोप केला.

फडणवीस म्हणाले, प्रारंभी उद्धव ठाकरे यांनी नाणारला विरोध केला. त्यानंतर त्यांनी नाणारसाठी स्वतः जी जागा सुचविली. तेथे प्रकल्प उभारण्यास देखील त्यांनी विरोध केला. मेट्रो असो की समृद्धी असो ते विरोध करत आले आहेत. त्यांचा विकासाला कायम विरोध राहिला आहे. नंतर ते प्रकल्पांचे श्रेयही घेतात. आता धारावीला विरोध करीत आहेत.पण हे लक्षात घ्या, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सर्व अटी-शर्ती या उद्धव ठाकरे यांच्या सरकारनेच बनविल्या आहेत. त्यात कुठलाही बदल शिंदे सरकारने केलेला नाही.

Back to top button