Maratha Reservation : संस्थानांकडे असलेले जुने रेकॉर्ड्स तपासा | पुढारी

Maratha Reservation : संस्थानांकडे असलेले जुने रेकॉर्ड्स तपासा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यात न्या. संदीप शिंदे समितीची बैठक होणार आहे, त्यानुषंगाने विभागीय आयुक्त सौरव राव यांनी पाच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांची बुधवारी बैठक घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील संस्थानांकडे असलेले जुने रेकॉर्ड्स तपासण्याचे आदेश दिले आहेत. कुणबी नोंदीसंदर्भातील पुरावे गोळा करण्यासाठी न्या. शिंदे समिती शनिवारी (दि. 9) पुण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सर्व जिल्हाधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली.

प्रत्येक जिल्ह्यात मराठा नोंदीविषयक किती कागदपत्रे तपासण्यात आली. त्यापैकी कुणबीची नोंद किती आहे. कुणबी मराठा, मराठा कुणबी अशा नोंदी किती ठिकाणी आहेत, त्याचा आढावा घेण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात अनेक जुनी संस्थांने आहेत. भोर, औंध, मिरज, सातारा यांसारख्या संस्थानांकडे जुने रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. त्या जुन्या रेकॉर्ड्सची तपासणी करा, असे पाचही जिल्हाधिकार्‍यांना आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरव राव यांनी दिली.

सर्व प्रमाणपत्रांची कारणमीमांसा होणार

नोंदणीची तपासणी, त्यानुसार घेण्यात आलेले निर्णय आणि त्याचा तपशीलही प्राप्त करून घ्यायचा आहे. एखाद्या व्यक्तीने जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला असेल तर त्याचा अर्ज फेटाळला आहे. तर त्याचा अर्ज नामंजूर करण्याचे कारण काय आहे. एखाद्या व्यक्तीला ’मराठा कुणबी’ म्हणून जात प्रमाणपत्र मिळाले असेल आणि त्याच्या पडताळणीसाठी त्याने अर्ज केल्यास त्याला तिकडेही नाकारले असेल तर त्याचे कारण काय आहे, असे सर्व अर्ज नामंजूर करणे किंवा जात पडताळणीमध्ये प्रमाणपत्र नाकारण्याच्या कारणांची मीमांसा केली जाणार आहे. त्याबाबत माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा

Back to top button