पुणे : पुढारी वृत्तसेवा : कचरा निर्मूलनासाठी महापालिका 'अॅक्शन मोड'वर आली असून, कचरा व घाण करणार्यांवर दंडात्मक कारवाई आणि थुंकीबहाद्दरांमुळे अस्वच्छ झालेले रस्ता दुभाजक जेटिंग मशिनच्या साहाय्याने धुण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याशिवाय कचरा टाकला जाणारी ठिकाणे (क्रॉनिक स्पॉट) शोधून त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करून दिली जाणार आहे.
देशात सर्वांत स्वच्छ व सुंदर शहर असलेल्या इंदूर शहरात करण्यात आलेल्या स्वच्छतेसंदर्भातील विविध उपाययोजना शहरात राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या निरीक्षकांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. जी 20 परिषदेनिमित्त महापालिकेने शहरातील अनेक रस्त्यांवरील दुभाजकांची रंगरंगोटी केली होती. त्यानंतर थुंकीबहाद्दरांमुळे खराब झालेले पदपथ व रस्तादुभाजक जेटिंग मशिनच्या साहाय्याने धुण्याचे काम हाती घेतले आहे.
शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने मंगळवारी रात्रीपासून गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता, फर्ग्युसन रस्त्यावरील दुभाजक धुऊन काढण्यास सुरुवात केली आहे. उर्वरित क्षेत्रीय कार्यालयांकडून देखील याची अंमलबजावणी केली जाणार आहे. दुभाजक धुण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाण्याचा वापर केला जाणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी सांगितले.
कचरा साठण्याची शहरातील ठिकाणे शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही ठिकाणे शोधून त्या ठिकाणी महापालिकेचा कर्मचारी नियुक्त केला जाणार आहे. सदर कर्मचारी हा संबंधित नागरिकांना कचरा टाकू नका, असे आवाहन करेल, तसेच ती व्यक्ती कोणत्या भागात आहे, तेथे कचरा गोळा करण्यासाठी काय यंत्रणा आहे, यंत्रणेचा वापर का करीत नाही, कचरा गोळा करणारे वाहन येत नाही का, अशी विविध प्रकारची माहिती संकलित करेल. त्याचवेळी संबंधित 'क्रॉनिक स्पॉट'च्या ठिकाणी कचरा टाकणार्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
इंदूर महापालिकेच्या धरतीवर फिरती पथके निर्माण करण्यात येणार आहेत. यासाठी चारचाकी चार वाहने खरेदी केली जाणार आहेत. या वाहनातील निरीक्षक हे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार्यांवर दंडात्मक कारवाई करणार आहेत. या वाहनांना पांढरा आणि पिवळा रंग दिला जाईल. तसेच या वाहनांवरून नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन केले जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या 450 कर्मचार्यांना वॉकीटॉकी देण्यात येणार आहे. यामुळे कचरा निर्मूलनाचे काम करण्यासाठी कर्मचार्यांमध्ये संपर्क निर्माण करण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा