पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवेअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच नव्याने स्थापन झालेल्या महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापकपदाच्या जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. धाराशिव, अलिबाग, सिंधुदुर्ग, नंदुरबार, परभणी व सातारा या ठिकाणी नव्याने वैद्यकीय महाविद्यालये स्थापन झाली आहेत.
फॉरेन्सिक मेडिसिन, फिजिओलॉजी, रेडिओ डायग्नोस्टिक/रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, रेडिओथेरपी, डरमॅटोलॉजी, पीडीयाट्रिक्स, फार्मालॉजी, ऑर्थोपेडिक्स आदी विषयांसाठी सहायक प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना येत्या 12 डिसेंबरपासून 1 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये प्रत्येक विषयासाठी आरक्षणनिहाय उपलब्ध जागा दिलेल्या आहेत.
त्यात खेळाडू आरक्षणासह दिव्यांग, अनाथ आरक्षणाचासुद्धा समावेश आहे. सहायक प्राध्यापकपदासाठी अर्ज करणार्या खुल्या संवर्गातील उमेदवारांचे वय 1 एप्रिल 2024 पर्यंत चाळीस वर्षे, तर मागासवर्गीय संवर्गातील व आरक्षित घटकातील उमेदवारांचे वय 45 पर्यंत असणे गरजेचे आहे. मुलाखतीची प्रक्रिया, आवश्यकता भासल्यास घेतल्या जाणार्या परीक्षेचा तपशील आदी माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे.
हेही वाचा