पणजीमधून भरकटलेली बोट वाचवण्यात तटरक्षक दलाला यश; २७ मच्छिमार सुरक्षित | पुढारी

पणजीमधून भरकटलेली बोट वाचवण्यात तटरक्षक दलाला यश; २७ मच्छिमार सुरक्षित

प्रभाकर धुरी

पणजी; पुढारी वृत्तसेवा : पणजीमधून भरकटलेल्या मच्छिमार बोटीवरील २७ जणांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. सहा दिवसांपूर्वी पणजीतून भरकटलेली ती बोट अंकोले तालुक्यातील बेलेकेरी येथे शोधून काढून किनाऱ्यावर आणण्यात आली.

पणजी (गोवा) येथून मच्छीमारीसाठी गेलेली बोट सहा दिवसांपूर्वी भरकटून समुद्रात गायब झाली होती. तटरक्षक दलांच्या जवानांनी अंकोला तालुक्यातील बेलेकेरी समुद्र किनाऱ्याजवळ या बोटीचा शोध घेऊन ती कारवार बंदरावर सुरक्षित आणली. या बोटीतील २७ मच्छीमारही सुखरूप आहेत.

पणजी येथील ‘क्रिस्टो रिया’ नावाची आयएनडी-जीए-०१-एमएम-२२३३ या क्रमांकाची बोट सहा दिवसांपूर्वी पणजीजवळूनच समुद्रात भरकटली होती. सात हजार लीटर डिझेल क्षमतेच्या या बोटीत २७ मच्छीमार कामगार होते. गोव्यातून समुद्रात गेल्यानंतर ही बोट भरकटली. त्यांना संपर्कही होत नव्हता. त्यामुळे तटरक्षक दलाच्या मदतीने या बोटीचा शोध घेण्यात आला. तेव्हा बेलेकेरी समुद्र किनाऱ्यापासून ३५ नॉटिकल मैल अंतरावर ही बोट असल्याचे आढळून आले. त्यांनी लगेच बोट व त्यातील २७ जणांना सुरक्षितपणे कारवार बंदरात आणले.

Back to top button