

वडगाव मावळ : लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शरद पवार शेंदूर लावतील तो आमचा उमेदवार असेल व तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकाही महाविकास आघाडीतील मित्र पक्षांसोबत पूर्ण ताकदीने लढणार असल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत व युवकचे तालुकाध्यक्ष
विशाल वहिले यांनी पत्रकार परिषदेत केला.
पत्रकार परिषदेस जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष किसन कदम, बारकू ढोरे, राजेश बाफना, मंगेश खैरे, आफताब सय्यद, सोमनाथ धोंगडे, विजय शिंदे, अमोल जांभुळकर, शंकर मोढवे, किरण ओव्हाळ, गणेश पाटोळे, प्रणव ढोरे, पंकज भामरे, राहील तांबोळी, स्वप्नील शेडगे, गौतम सोनवणे, आशिष भालेराव, प्रवीण अंभोरे आदी उपस्थित होते.
ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत म्हणाले, की पक्षाची विभागणी झाल्यापासून पक्षनेते शरद पवार यांना मानणारे अनेक कार्यकर्ते संपर्कात आहेत. आगामी काळात त्यांनाही पक्षकार्यात सहभागी करून घेऊन शरद पवारांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
पक्षाची विभागणी होऊन पाच महिने झाल्यानंतर शरद पवार गटात सक्रिय होण्यामागे आमदार सुनील शेळके यांची कार्यपद्धती किंवा अजित पवार गटाचे कामकाज याविषयी नाराजी आहे का? या प्रश्नाविषयी बोलताना तालुकाध्यक्ष पडवळ यांनी आम्ही कोणीही आमदार शेळके किंवा अजित पवार गटाच्या कामकाजावर नाराज नाही. परंतु, ज्यांच्यासोबत संघर्ष केला त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका पटली नसल्याने व शरद पवार यांच्यावर निष्ठा असल्याने सक्रिय होण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
पक्षनेते शरद पवार यांना मावळ तालुक्याविषयी विशेष प्रेम असून आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जानेवारी महिन्यात मावळ तालुक्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत तालुक्यातील शेतकर्यांचा मेळावा होणार आहे.
– अतुल राऊत, जिल्हाध्यक्ष, ओबीसी सेल
युवक कार्यकर्त्यांना संघटित करून पक्षकार्यात युवा पर्व निर्माण करण्याचा मानस शरद पवार यांचा आहे. त्यांच्या या संकल्पणेनुसार तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील युवा कार्यकर्त्यांना विविध पदाच्या माध्यमातून कामाची संधी दिली देऊन युवा पर्व सक्रिय करणार आहोत.
– विशाल वहिले, तालुकाध्यक्ष, युवक
पक्षनेते शरद पवार यांच्या कर्तृत्वावर प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आजतागायत पक्षामध्ये कार्यरत आहे. शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आगामी काळात तालुक्यात पक्षवाढीच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवणार असून, तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सक्रिय होणार आहे.
– दत्तात्रय पडवळ, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी
हेही वाचा