Pune : जवळेत आढळली रानमांजराची पिले | पुढारी

Pune : जवळेत आढळली रानमांजराची पिले

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : जवळे (ता. आंबेगाव) येथे मंगळवारी (दि. 5) ऊसतोडणी सुरू असताना दुर्मीळ रानमांजराची दोन पिले आढळली. बिबट्याची पिले वाटल्याने ऊसतोड कामगारांमध्ये सुरुवातीला घबराट पसरली होती. परंतु, ती रानमांजराची पिले
असल्याचे वन विभागाने सांगितल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर यांच्या जवळे पठारावरील शेतात मंगळवारी सकाळी ऊसतोडणी सुरू झाली. काही वेळाने उसात रानमांजराची दोन पिले आढळली. ती बिबट्याची असावीत, असे समजून उसतोड कामगारांमध्ये घबराट पसरली. त्यांनी ऊसतोडणी थांबवून खालकर याबाबत माहिती दिली. खालकर यांनी वळती बीटचे वनपरिमंडलाधिकारी प्रदीप कासारे यांना याबाबत माहिती दिली.

संबंधित बातम्या :

वन विभागाचे रेस्क्यू पथकाचे सदस्य दत्तात्रय राजगुरव, वन कर्मचारी संपत भोर, शरद जाधव, महेश टेमगिरे यांनी शेतात धाव घेतली. तोपर्यंत पिले शेजारच्या ऊसशेतात निघून गेली. वन विभागाने ऊसतोडणी कामगारांजवळ चौकशी केली असता त्यांनी त्या पिलांचे फोटो, चित्रफीत दाखवली. याबाबत निसर्ग अभ्यासक दत्तात्रय राजगुरव म्हणाले ‘ही पिले दुर्मीळ रानमांजरांची आहेत . त्यांना वाघाटी असेही म्हणतात. वाघाटी शेतातील उंदीर, घुशी, साप, विंचू खातात. त्यांचा मनुष्याला कोणताही उपद्रव नसतो. या परिसरात हा प्राणी दुर्मीळ झाला आहे. ऊसतोडीमुळे ते आढळून येत आहेत.

Back to top button