Pune News : पुण्यात उमटणार इंदूरच्या स्वच्छतेचे पाऊल

Pune News : पुण्यात उमटणार इंदूरच्या स्वच्छतेचे पाऊल
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सलग सहावेळा स्वच्छतेत अव्वल क्रमांक पटकाविलेल्या मध्य प्रदेशातील इंदूर शहरात राबविल्या जाणार्‍या कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. या द़ृष्टीने पहिल्या टप्प्यात कर्मचार्‍यांना प्रशिक्षण, घंटागाडी व स्वच्छता कर्मचार्‍यांना वॉकी टॉकी आणि ओल्या कचर्‍यापासून गॅस प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या अधिकार्‍यांनी नुकताच इंदूर शहराचा अभ्यास दौरा केला. या दौर्‍यात अधिकार्‍यांनी इंदूर महापालिकेची कचरासंकलन व्यवस्था, कचरा संकलित करणार्‍या वाहनांचे ट्रॅकिंग, कचरा प्रक्रिया प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प आदींसह कचरानिर्मूलन व स्वच्छतेसाठी राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती घेतली. स्वच्छता सर्वेक्षणात 2016 मध्ये इंदूर शहर हे 25 व्या क्रमांकावर होते. सुमारे 30 ते 34 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात दररोज सरासरी एक हजार टन कचरा जमा होतो. इंदूर शहरात 2015 मध्ये फक्त दोन वॉर्डामधून कचराकुंड्या पूर्णपणे हटवून घरोघरी जाऊन कचरा संकलन, ही यंत्रणा प्रायोगिक तत्वावर राबविली. नागरिकांच्या उत्तम प्रतिसादानंतर 2016 पासून पूर्णवेळ आणि सर्वच वॉर्डात ही यंत्रणा राबवली.

आज संपूर्ण शहर कचराकुंडीमुक्त झाले असून शहराचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात घटले आहे. येथील सांडपाण्यावरही तीन एसटीपी प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जाते. या पाण्याचा वापर सार्वजनिक उद्याने, शेतात व बांधकामांसाठी केला जात असल्याची माहिती इंदूर महापालिकेच्या अधिकारी श्रद्धा तोमर यांनी दिली. दरम्यान, इंदूर दौर्‍यावर पाहिलेल्या स्वच्छेविषयीच्या विविध उपाययोजना पुणे महापालिकेच्या अधिकार्‍यांनीही शहरासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार घनकचरा विभागाच्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचे वेळापत्रक तयार करून ते जाहीरही केले आहे. याशिवाय वॉकीटॉकी व सीएनजी गॅस प्रकल्प तयार करण्याचे विचाराधीन असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

नागरिकांचे शहरावर प्रेम आणि स्वयंशिस्त

कोणत्याही पक्षाची सत्ता असली तरी इंदूरच्या स्वच्छता उपाययोजनांमध्ये राजकीय पक्षांचा हस्तक्षेप होत नाही. प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडून स्वच्छतेमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला आहे. तेथील नागरिकांचे शहरावर असलेले प्रेम आणि लोकसहभाग वाढल्याने लोकांनाच शहराची स्वच्छता अंगवळणी पडली आहे. लोक स्वतः कचरा करीत नाहीत आणि इतरांनाही करून देत नाहीत. लोकस्वयंशिस्त झाल्याने त्याचा प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे.

वाहनांवर नजर ठेवण्यासाठी कमांड सेंटर

घरोघरी कचरा गोळा करणार्‍या वाहनांवर नजर ठेवण्यासाठी कचरा व्हॅन कमांड सेंटर आहे. कचरा वाहतुकीच्या सर्व वाहनांना जीपीएस जोडले आहे. या वाहनांंना पॉइंट टू पॉइंट रुट ठरवून दिला आहे. यामध्ये प्रत्येक ठिकाणी वाहन किती वेळ थांबले, कोणता पॉइट चुकविला, कोणत्याही मार्गावर बिघाड, रस्ता बंद असल्यास किंवा चालकाची तब्येत ठीक नसल्यास याची माहिती नियंत्रण कक्षात पाहता येते. पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ एखादे वाहन एकाच पॉइटवर थांबले तर संगणकावर तसे नोटिफिकेशन मिळते. त्यानंतर संबंधित व्यक्ती ही वाहनचालकाशी मोबाईल किंवा वॉकी टॉकीवर संपर्क साधते. अडचण असल्यास सोडविण्यासह प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवली जाते.

पोलिसांपेक्षा कचर्‍याच्या पिवळ्या गाडीचा धाक

कचर्‍यासंदर्भात चांगली सवय लावण्यासाठी कठोर उपाययोजना केली. महापालिका कचरा विभाग आणि पोलिस यांच्या सहकार्याने कंट्रोल रूम तयार केली. कचरा विभागातील कर्मचार्‍यांना संपर्कासाठी वॉकी-टॉकीसारखी यंत्रणा दिली आहे. कारवाईवेळी विरोध झाल्यास कर्मचारी वॉकी-टॉकीवर संपर्क साधतात. त्यानंतर तत्काळ पोलिस, कचरा विभागाचे अधिकारी, पालिकेचे वरिष्ठ अधिकारी तेथे हजर होतात. त्यामुळे विरोध करणार्‍या लोकांवर दबाव येतो. त्यामुळे पोलिसांपेक्षा कचरा पथकाची भीती तेथील नागरिकांना जास्त आहे.

आशिया खंडातील सर्वांत मोठा सीएनजी प्लांट

इंदूर शहराच्या कचरा विल्हेवाट करण्याच्या प्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे बायो सीएनजी प्लांट, जो शहरातून गोळा केलेल्या ओल्या कचर्‍यावर चालतो. हा प्लांट आशियातील सर्वांत मोठा असल्याचा दावा तेथील अधिकारी करतात. देवगुराडिया येथील या प्लांटची 550 मेट्रिक टन कचर्‍यावर प्रतिदिवस प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. दररोज 17 ते 18 टन बायो सीएनजी आणि 10 टन सेंद्रिय खत तयार केले जात आहे. कचर्‍याबरोबरच बांधकाम राडारोड्यावर प्रक्रिया करून त्यापासून चेंबरची झाकणे आदी उपयोगी वस्तू तयार केल्या जातात.

स्वच्छता मित्र 24 तास कार्यरत

इंदूर महापालिकेकडे एकूण सुमारे 20 हजार कर्मचारी असून, त्यापैकी कायम कर्मचार्‍यांची संख्या 3 ते 4 हजार आहे. उर्वरित ठेकेदारी पद्धतीने आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सुमारे 7 हजार 500 कर्मचार्‍यांची फौज असून, स्वच्छतामित्र असे त्यांना संबोधले जाते. जे तीन शिफ्टमध्ये काम करतात.

100 टक्के कचरा वर्गीकरण

महापालिकेच्या स्व-मालकीची 750 वाहनांद्वारे घरोघरी जाऊन आणि व्यावसायिक आस्थापनांमधून दररोज कचरा गोळा केला जातो. एक वाहन सुमारे 900 घरांतून कचरा गोळा करते. हा कचरा गोळा करतानाच त्याचे ओला, कोरडा, इलेक्ट्रॉनिक्स, प्लास्टिक, बायोमेडिकल, सॅनिटरी नॅपकिन अशा विविध श्रेणीत वर्गीकरण केले जाते. या कचर्‍यासाठी वाहनामध्ये स्वतंत्र कप्पे आहेत. हेच इंदूरचे स्वच्छता मॉडेल आहे. नागरिकांकडून शंभर टक्के वर्गीकरण करूनच कचरा घेतला जातो, असे इंदूर महापालिकेचे कर्मचारी गुलाब नागर यांनी सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news